महाराष्ट्रात वारी आणि वारकरी हे अतूट आणि अभेद्य असे नाते शेकडो वर्षांपासूनचे आहे. मात्र कोरोना महामारीने मागच्या वर्षी हे नाते खंडित झाले. पायी वारीला परवानगी नाकारल्याने लाखो वारकरी बांधवांनी स्थुलातून नाही तर सूक्ष्मातून श्री विठ्ठलाला अनुभवण्याची अनुभूती घेतली. दुर्दैवाने यंदाच्या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावेळीही पायी वारीला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदाही वारकरी बांधवाना घरूनच विठ्ठलाला नमस्कार करावा लागणार आहे.
२० बसगाड्यांमधून पालख्या निघणार!
आषाढीच्या वारीसाठी राज्यातील ज्या मानाच्या दहा पालख्या आहेत, त्यांनाच बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 20 बसगाड्या देण्यात येणार आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची बैठक झाली. त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि पायी वारीला परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा : अजित पवारांनी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना झापले!)
पालख्यांसोबत जाणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची
या दहाही पालख्यांसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. तर देहू-आळंदी पालखीबरोबर 100 जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली. या सर्व पालख्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.
रिंगणाला अटींवर परवानगी
वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास देण्यात आली नाही, मात्र रिंगण उत्सव अटीशर्थींच्या आधारे होऊ शकते, असेही पवार म्हणाले. दरम्यान भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असून कुणीही पंढरपूरला येऊ नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कोणत्या आहेत मनाच्या पालख्या?
- संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
- संत सोपान काका महाराज (सासवड)
- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
- संत तुकाराम महाराज (देहू)
- संत नामदेव महाराज (पंढरपूर)
- संत एकनाथ महाराज (पैठण)
- रुक्मिणी माता (कौडानेपूर -अमरावती)
- संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)
- संत चांगाटेश्वर महाराज (सासवड)
(हेही वाचा : ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी केंद्राचे महाराष्ट्राला मोठे आर्थिक पाठबळ)
Join Our WhatsApp Community