आता गावागावात कोविड सेंटर, असे सुरू आहे गावपातळीवर काम

आता गाव पातळीवर देखील कोविड सेंटर उभारण्याकडे भर देण्यात आला आहे.

राज्यात मुंबईसारख्या शहरात जरी आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत असले, तरी राज्यातील ग्रामीण भागांत मात्र कोरोनाचे रुग्ण काही कमी होताना दिसत नाहीत. त्याचमुळे आता राज्य सरकारने देखील तिथल्या स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले आहेत. याच वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गावागावात कोविड सेंटर उभारण्यावर भर देण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीवर जबाबदारी

सध्या रेड झोनमध्ये गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे होम आयसोलेशन बंद केल्यानंतर, आता ग्रामस्तरावरच प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपवण्यात येणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी बुधवारी दिली. सर्व गटविकास अधिकाऱ्यांना प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे शाळा आणि रिकाम्या इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली देखील गावपातळीवर सुरू करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचाः राज्यात लॉकडाऊन कायम राहणार! पण…)

रायगडमध्येही जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज

रायगड जिल्ह्यात 5 हजार 126 जण घरीच राहून उपचार घेत आहेत. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यासाठी पावले उचलली आहेत. गावागावात ग्रामसमिती स्थापन असून, गावात होम आयसोलेट असणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली जात आहे. सामाजिक संस्थेतर्फे कोरोना रुग्णांना रोज औषधे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

२५ टक्के निधी वापरण्याचे निर्देश

ग्रामपंचायतीने 15व्या वित्त आयोगाच्या निधीतील 25 टक्के निधी गावात कोविड सेंटर उभारण्यासाठी खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गावागावात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये उपचार मिळाल्यास प्रादुर्भाव वाढण्याची शक्यताही कमी होणार आहे. त्याचमुळे आता गाव पातळीवर देखील कोविड सेंटर उभारण्याकडे भर देण्यात आला आहे.

(हेही वाचाः कोरोना पॉझिटिव्ह असाल तर आता तुमची रवानगी होणार… जाणून घ्या कुठे ते?)

राज्यातील रेड झोन असलेले जिल्हे

राज्यात लॉकडाऊन कमी करुनही जिल्ह्यातील रुग्णसंख्या काही कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नुकतीच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंधरा जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे 31 मे नंतर जरी राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाली, तरी या जिल्ह्यांमध्ये शिथीलता येण्याची शक्यता कमी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here