मागील दोन वर्षांपूर्वी देशासह महाराष्ट्रातही कोरोनाने अक्षरशः धुडगूस घातलेला होता. त्यावेळी प्राण धोक्यात घालून कोरोना वाॅररियर्सने आपली जबाबदारी पार पाडली. विशेषतः वैद्यकीय विभागात काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कंत्राटी कामगारांनी अहोरात्र काम करून हजारोंचे प्राण वाचवले. आता हेच २०० कंत्राटी कामगार जेव्हा सरकारला सरळ सेवेत भरती करावी, अशी मागणी करू लागले असताना त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मिळत नाही. त्यामुळे या कंत्राटी कामगारांना न्याय मिळेल का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
कामगारांनी मांडली व्यथा
या कामगारांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवेदन दिले. गेल्या ५-६ वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात अनेक कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. यात डॉक्टर्स, परिचारिका, लॅब टेक्नीशियन, अस्टिस्टंट, आंगणवाडी सेविका, शिपाई आणि इतर सर्व पदांवरील कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. आजही हे सर्व विविध रुग्णालयांत कंत्राटी तत्वावर काम करीत आहेत. त्याशिवाय त्यांचे मानधन सरळ सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यल्प असून तेदेखील वेळेत मिळत नाही, अशी व्यथा या कामगारांनी मांडली.
(हेही वाचा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख नक्की झाले कधी? निवडणूक आयोग विचारू शकतो अडचणींचे प्रश्न)
कामगारांची काय आहे मागणी?
विशेष म्हणजे महानगरपालिकेमध्ये अनेक पदे रिक्त असूनही पदभरती झाली नाही. तसेच आता जर पद भरती निघाली तर त्यात सध्या कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी यांचे वय बसणार नाही आणि राखीव जागांवर इतर उमेदवार त्यांची उमेदवारी सादर करू शकतात. त्यामुळे विविध रुग्णालयातील विविध रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सरळ सेवेत रुजू करून घ्यावे. तसेच सरळ सेवेचा लाभ आम्हाला द्यावा. सुमारे ४-५ दिवसांपूर्वी कोविड काळात काम केलेल्या ५९७ नर्सेसना सरळसेवेत रुजू करण्यात आले. तसेच १५ ऑक्टोबर २०२२ रोजी ओडिशा सरकारने त्यांच्या ५७ हजार कंत्राटी कामगारांना अधिकृतपणे सरळ सेवेत सामावून घेतले. याची राज्य व केंद्र सरकारने दखल घेऊन २०० की श्रेणीतील कंत्राटी कामगारांनाही नियमित करावे, अशी मागणी या कामगारांनी केली. त्याचबरोबर समान वेतन समान काम हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्वरीत अंमल करावा आणि कोविड काळातील कंत्राटी कामगारांना सरळ सेवेत घेऊन सर्व सुविधा, भत्ते, नैतिभिक रजा देण्यात यावी, अशी मागणी या कामगारांनी केली आहे.