सणांवरील निर्बंधांची हंडी फुटली! फुकटात बांधा मंडप, दणक्यात साजरा करा उत्सव

कोविड काळात लॉकडाऊनमध्ये गणोशोत्सव, दहीहंडी उत्सव, मोहरम यांसारख्या उत्सवांवर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. पण यावर्षी होणा-या या सर्व उत्सवांवरचे निर्बंध हटवण्याचा निर्णय आता शिंदे-फडणवीस सरकराकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मंडळांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

गुरुवारी गणेशोत्सव आणि गोपाळकाला मंडळे आणि मूर्तिकारांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. यासोबतच गणेशोत्सव मंडळांना मंडपांसाठी द्यावे लागणारे शुल्कही सरकारकडून माफ करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना आता विनामूल्य मंडप बांधता येणार आहेत.

निर्बंधांविना होणार उत्सव

गेले दोन वर्ष सर्व सण उत्सवांवर मर्यादा होत्या. त्यामुळे इच्छा असूनही आपल्याला ते सण साजरे करण्यात आले नाहीत. पण यावर्षी सर्व मंडळांचा उत्साह पाहता गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम हे उत्सव उत्साहात साजरे करण्यासाठी त्यांवरील बंधने हटवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. हे उत्सव शांततापूर्ण होण्यासाठी प्रशासन यंत्रणेला योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विनामूल्य बांधा मंडप

मंडळांना गणेशोत्सव मंडपांसाठी परवानगी द्यायला एक खिडकी योजना सुरू करुन त्यांना ऑनलाईन पद्धतीने देखील ही परवानगी देण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सव मंडळांना या परवानगीसाठी लागणा-या नोंदणी शुल्कात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा राज्यातील गणेशोत्सव मंडळांना मंडपांसाठी विनामूल्य परवानगी मिळणार आहे.

तसेच कोविडमुळे मूर्त्यांच्या उंचीवर घालण्यात आलेले निर्बंध देखील आता काढून टाकण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here