राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार?

मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत आता जे नियम आहेत तेच नियम लागू राहतील, अशी माहिती मिळत आहे.

राज्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने, ठाकरे सरकारने २२ एप्रिल रात्री ८ पासून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. ब्रेक दि चेन म्हणत ठाकरे सरकारने या काळात कोरोना साखळी तोडण्यावर देखील भर दिला आहे. १ मे पर्यंतचा लॉकडाऊन संपायला आता अवघे काही दिवस उरले असताना १ मे नंतर राज्यात काय परिस्थिती असेल, लॉकडाऊन उठेल का? की आणखी लॉकडाऊन वाढेल, असे एक ना अनेक प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. मात्र हिंदुस्थान पोस्टला मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असून, मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत आता जे नियम आहेत तेच नियम लागू राहतील, अशी माहिती मिळत आहे.

काय आहे सरकारचा विचार?

एका उच्चपदस्थ  अधिकाऱ्याशी खासगीत बोलले असता, राज्यात लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागला आहे. रुग्णसंख्या देखील कमालीची घटत आहे. याचमुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणखी काही दिवसांचा लॉकडाऊन वाढवावा असा सरकारचा विचार आहे. याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः कोरोनासोबतच अफवांचीही पसरतेय लाट… असा पोखरतोय व्हायरल मेसेजचा ‘व्हायरस’! तथ्य आले समोर)

म्हणून लॉकडाऊन वाढणार

१ मे नंतर लॉकडाऊन आणखी सात दिवसांनी वाढवावे, असे मत टास्क फोर्सच्या काही अधिकाऱ्यांनी मांडले होते. मात्र १४ मे रोजी रमजान ईद असल्याने या काळात गर्दी होऊ शकते. त्याचमुळे रमजान ईद झाल्यानंतरच लॉकडाऊन उठवायचे असा एक सूर आहे. काही मंत्र्यांचे देखील तेच मत आहे. रमजान ईद म्हटले की, मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव खरेदीसाठी बाहेर पडत असतात. त्याचमुळे रमजान ईदच्या आधी राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली, तर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे आटोक्यात आलेली रुग्ण संख्या वाढू शकेल, अशी भीती देखील सरकारला वाटत आहे. याचमुळे १ मे नंतर आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय या महिन्याच्या शेवटच्या दिवशी होऊ शकतो.

लॉकडाऊन वाढण्याचे हेही आहे आणखी कारण

एप्रिल-मे महिना म्हटलं की, लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यातच एप्रिल महिन्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने अनेक लग्न सोहळे रद्द झाले आहेत. मात्र आता मे महिन्यात जर निर्बंध शिथिल केले, तर पुन्हा एकदा लग्न समारंभांमध्ये देखील गर्दी होईल. त्यामुळे किमान १५ मे पर्यंत तरी आता जे नियम आहेत तेच कायम ठेवून, लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यावर सरकारचा भर आहे.

(हेही वाचाः लॉकडाऊनच्या काळात सरकारला तारले दारूने! तिजोरीत १५,०९० कोटी जमा! )

या काळात लसीकरणावरही भर देणार

संपूर्ण देशामध्ये १८ वर्षांच्या वर सर्वांना १ मे पासून लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यात देखील १ मे पासून लसीकरण मोहीम जोरात सुरू होणार आहे. यासाठी राज्य सरकार कामाला सुद्धा लागले आहे. विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे वाढवण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. त्याचमुळे जर १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवून या काळात सर्वाधिक लसीकरण करुन घ्यावे, असा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे.

(हेही वाचाः आता मोफत लसीवरुन ठाकरे सरकारमध्ये ‘रस्सीखेच’!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here