चालू शैक्षणिक वर्षांपासून आता इयत्ता पहिलीपासून सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी भाषा शिकवण्याची सक्ती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ज्या शाळा याचे पालन करणार नाहीत त्यांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. मराठी भाषेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे मराठी न शिकवणाऱ्या शाळांना मोठा झटका देण्याची तयारी सरकारने केली आहे.
सर्व माध्यमांच्या शाळांंना सक्ती
मराठी शिकविण्याबाबत सर्व माध्यमांच्या शाळांना शिक्षण विभागाच्यावतीने सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळांना मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असणार आहे. ज्या शाळा या नियमांची अंमलबजावणी करणार नाहीत, अशा शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. मराठी न शिकविणाऱ्या शाळांकडून एक लाख रुपये दंड वसूल करावा, असे निर्देश शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्व माध्यांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असणार आहे. राज्यात सर्व शाळांमध्ये मराठीचे शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी महाराष्ट्र मराठी भाषा शिकणे आणि शिकवणे कायदा 2020 राज्य सरकारकडून संमत करण्यात आला आहे.
निर्णयाची अंमलबजावणी ५ टप्प्यांत होणार
- २०२०-२०२१-पहिली/सहावी
- २०२१-२०२२-दुसरी/सातवी
- २०२२-२०२३-तिसरी/आठवी
- २०२३-२०२४-चौथी/नववी
- २०२४-२०२५-पाचवी/दहावी