गेले काही दिवस राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातला वाद चांगलाच चिघळला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील लेटर वॉरमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यामुळे ओबीसींच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने पाठवलेल्या अध्यादेशात राज्यपालांनी काही त्रुटी काढल्या होत्या. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश राजभवनात अडकणार, असे बोलले जात होते. पण अखेर सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केली असून, यामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
लवकरच होणार कायद्यात रुपांतर
राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवला होता. पण त्यातल्या काही त्रुटी अधोरेखित करत राज्यपालांनी तो राज्य सरकारकडे पुनर्विचारासाठी पाठवला. त्यामुळे राज्य सरकारने या त्रुटी दूर करत सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला. या सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी संध्याकाळी स्वाक्षरी केली असून, या स्वाक्षरीमुळे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होण्याच्या प्रक्रियेला हिरवा कंदिल मिळाला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे.
(हेही वाचाः ‘त्या’ भेटीमुळे शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेसवर नाराज?)
भुजबळांनी मानले आभार
राज्यपालांनी सांगितलेल्या त्रुटी दूर करत आम्ही आम्ही सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला. त्या सुधारित अध्यादेशाला राज्यपालांनी मंजुरी दिल्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया अन्न ल नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. यामुळे आपल्याला आनंद झाला असून लढाई अजून मोठी आहे, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community