गेल्या दोन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची घटलेली संख्या पुन्हा एकदा वाढायला लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेत राज्यांना कोरोना नियंत्रणाबाबत पत्र लिहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात येणार का, अशी चर्चा सुरू झाल्या आहेत.
याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असून मास्कसक्तीबाबत विचार नाही, पण ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने मास्क वापरावेत, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.
(हेही वाचाः केवळ बारा मिनिटांत ‘असा’ मिळवा मालमत्तेचा ‘सातबारा’)
काय म्हणाले टोपे?
केंद्राकडून आलेल्या पत्रात पाच,सात राज्यांची उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 135 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी मुंबईत 85 रुग्ण आढळून आले आहेत. ज्या महाराष्ट्राने 60 हजार कोरोना रुग्णांची संख्या रोज पाहिली आहे, त्यामानाने राज्यातील ही स्थिती नियंत्रणात असून घाबरण्याचे काही कारण नसल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात सध्या मास्क वापरणं बंधनकारक नाही. पण ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले रुग्ण यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची काळजी घ्यावी, अशी विनंती राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे.
योग्य निर्णय घेण्यात येईल
राज्यातील लसीकरणाला चांगला वेग मिळत असून, बूस्टर डोसचे प्रमाण वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पाश्चिमात्य देशांत तसेच दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती बिकट होत असल्याचे समजताच आयसीएमआर, राज्याचा टास्क फोर्स आणि भारत सरकारशी चर्चा करुन योग्य वेळी निर्णय घेण्यात येतील, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचाः जुगारासाठी चक्क महाराष्ट्र शासनाच्या गाडीचा वापर!)
Join Our WhatsApp Community