कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच होळी, धुळवड (रंगपंचमी) साजरी करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्याने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. म्हणूनच राज्याच्या गृह खात्याकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
( हेही वाचा : Non-Veg प्रेमींना धक्का! सुरमई, पापलेट नव्या दरात )
राज्य सरकारने होळीसाठी खालीलप्रमाणे नियमावली जाहीर केली आहे…
- रात्री १० वाजल्यानंतर होळी साजरी करता येणार नाही. तसेच डीजे लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
- होळी आणि रंगपंचमी / धुळवड साजरी करत असताना मद्यपान करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
- या कालावधीत विशेष करून शहरी भागांत रंगांच्या पाण्याने भरलेले फुगे किंवा पिशव्या मारल्या जातात मात्र, असे करत असताना अनेकदा दुर्घटनाही घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच यंदा रंगपंचमीच्या दिवशी जबरदस्तीने रंग किंवा पाण्याने भरलेले फुगे मारू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- कुठल्याही जाती किंवा धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा घोषणा देऊ नये.
- होळीच्या सणानिमित्त वृक्षतोड करू नये, केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- होळी सणावेळी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणताही डीजे लावण्यास परवानगी नाही. जर कोणी डीजेचा वापर करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, सर्वसामान्य जनतेस त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- होळी साजरी करताना मद्यपान करून बिभत्स व उद्धट वर्तन होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- होळी सणानिमित्त जमा होणाऱ्या महिलांची व मुलींची कोणीही छेड काढणार नाही. याबाबत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे. सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल, महिलांनी परिधान केलेले दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.
- होळी सणानिमित्त कोठेही आगी लागतील, असे कृत्य करू नये.