कोरोना काळात दाखल झालेले गुन्हे घेणार मागे

131

कोरोनाच्या काळात राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर राज्यभरात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असून गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून त्याच्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे.

( हेही वाचा : आता मुंबईतील ‘या’ 19 गर्दीच्या स्थानकांमध्ये होणार एकमजली स्टेशन! )

गुन्ह्यांचा आकडा लाखोंच्या घरात

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन, तसेच संचारबंदी लागू करण्यात आली होती. याकाळात या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर राज्यभरात कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. राज्यभरात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यांचा आकडा लाखोंच्या घरात गेलेला आहे. त्यापैकी काही शे गुन्हे निकाली काढण्यात आलेले आहेत.

सर्वाधिक नुकसान विद्यार्थ्यांचे

कोरोनाच्या काळात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान विद्यार्थ्यांचे होत असून त्यांना परदेशात जाण्यासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व त्यांना शिक्षणासाठी परदेशात जाताना अडचण येऊ नये यासाठी त्यांच्यावर दाखल झालेले कलम १८८ अंतर्गत दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला आहे. या संदर्भात गृहमंत्री यांनी एक प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असून लवकरच राज्यभर दाखल झालेले कलम १८८ चे गुन्हे मागे घेण्यात येतील असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

गुन्हे दाखल असणाऱ्यांना करावा लागतो या गोष्टींचा सामना-

भारतीय दंड विधान कलमतर्गत दाखल होणाऱ्या दखलपात्र अथवा अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपीला पदोपदी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. भादवी अंतर्गत गुन्हे दाखल होणाऱ्याला देश सोडून परदेशात जाता येत नाही, त्याचबरोबर त्या व्यक्तीला नोकरीच्या ठिकाणी अडचणींना सामना करावा लागतो, त्याचबरोबर नवीन नोकरीच्या ठिकाणी लागणारी ना- हरकत प्रमाणपत्र पोलीसांकडून मिळवावे लागते, परंतु गुन्हा दाखल असणाऱ्याला हे प्रमाणपत्र मिळवताना अडचण होते.

कलम १८८ काय आहे?

कलम १८८ कायदा १८९७ साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार या काळात शासनाकडून नियम लागू होत असतात, शासकीय अधिकारी या अनुषंगाने वेगवेगळे आदेशही देऊ शकतात,या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो.

कलम १८८ मध्ये काय आहे शिक्षेचे तरतूद –

कलम १८८ या कायद्याच्या तरतुदीनुसार फक्त आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात. दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास आणि त्यातून मानवी जीवन वा आरोग्य धोक्यात सापडले तर त्या व्यक्तीस सहा महिने कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.