एचएससी, एसएससी विद्यार्थ्यांना परीक्षा ‘फी’ परत मिळणार!

राज्य शिक्षण मंडळाने कोविड-१९ महामारीमुळे या वर्षी रद्द झालेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एसएससी) आणि उच्च माध्यमिक शाळा (एचएससी) परीक्षांसाठी गोळा केलेल्या शुल्काच्या १४ ते १८ टक्के शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना एसएससी आणि एचएससी २०२१ च्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे तपशील अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परताव्याची रक्कम प्रत्येक शाळेच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना परत केलेले शुल्क परत करण्याची जबाबदारी शाळेची असेल, असेही सांगितले जात आहे.

याचिका दाखल

बोर्डाच्या परीक्षेसाठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या चौदा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. अंतर्गत मूल्यांकनावर आधारित निकाल मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये जाहीर केले. सांगली जिल्ह्यातील मिरज येथील एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने परीक्षा शुल्क परत करण्यासाठी जनहित याचिका दाखल केल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने बोर्डाला याचिकेवर विचार करण्यास सांगितले होते. याचिकाकर्त्याने निदर्शनास आणून दिले होते की बोर्डाने विद्यार्थ्यांकडून १५० कोटींहून अधिक रुपये गोळा केले होते आणि परीक्षा रद्द केल्यानंतर ते परत न करणे म्हणजे नफाखोरी आहे.

( हेही वाचा : टीबीच्या शोधात महापालिकेची ८७६ पथके दारोदार )

पैसे परत करण्याचा निर्णय

बोर्डाने मंडळाने गोळा केलेले पैसे अंशतः परत करण्याचा निर्णय घेतला आहे. एसएससी परीक्षेसाठी चारशे पंधरा रुपये भरणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना ५९ रुपये किंवा १४% परतावा मिळेल. पाचशे वीस रुपये भरलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना ९४ रुपये १८% परतावा मिळेल. ऑक्टोबरमध्ये पुरवणी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परतावा मिळू शकणार नाही. यावर राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी, येणाऱ्या परीक्षांची तयारी म्हणून खर्च करण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here