संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात बॉम्बे ब्लडग्रुप या दुर्मिळ रक्तगटाची देशभरात अचानक मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. या रक्तगटाचे देशात केवळ ४०० व्यक्ती आहेत. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या रक्ताच्या मागणीमुळे महाराष्ट्र राज्याने देशभरातील विविध राज्यांना या दुर्मिळ रक्तगटाच्या बाटल्या पुरवल्या. या दुर्मिळ रक्तगटाची वाढती मागणी लक्षात घेता देशपातळीवर बॉम्बे ब्लडग्रुपच्या दात्यांची केंद्रपातळीवर नियोजित साखळी तयार केली जावी, अशी मागणी विविध रक्तपेढ्यांमधील काम करणा-या तज्ज्ञांनी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
( हेही वाचा : शहराच्या पालकमंत्र्यांनी अचानकपणे अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्तांची घेतली शाळा, पण आयुक्त मुख्यमंत्र्यासमवेतच्या बैठकीला उपस्थित)
राज्यातील महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्यावतीने राज्यातील बॉम्बे ब्लडग्रुपच्या लोकांची माहिती गोळा केली जात आहे. या सदस्यांची नावे तसेच संपर्क क्रमांकांची नोंद ठेवत आपत्कालीन प्रसंगात त्यांना रक्त देण्यासाठी बोलावले जाते. ऑक्टोबर महिन्यात अलिबाग येथून दोन व्यक्तींना रक्तदानासाठी संपर्क करण्यात आला. नियोजित केंद्रात दोन्ही व्यक्ती पोहोचल्यानंतर दोघांच्याही शरीरात हिमोग्लोबीन फारच कमी होते. परिणामी, त्यांच्याकडून रक्त घेता आले नाही. अशा काही घटना घडल्यास वेळेवर गरजू रुग्णांना रक्त मिळण्यात अडचणी येतात. संपूर्ण महिन्यात उत्तर भारतांतील विविध रक्तपेढ्यांतून महाराष्ट्र राज्याला बॉम्बे ब्लडग्रुप मिळवण्यासाठी सातत्याने संपर्क केला गेला, अशी माहिती रक्तपेढ्यांत काम करणा-या सदस्यांनी दिली. दिल्ली, सूरतहून संपूर्ण महिन्याभरात बॉम्बे ब्लडग्रुपची मागणी वाढली होती. दिल्लीत तर एकाचवेळी रक्ताच्या पाच ते सहा युनिट्स पाठवल्या गेल्या.
संपूर्ण देशभरातील बॉम्बे ब्लडग्रुपच्या सदस्यांची माहिती एका नोंदणीवर तयार केली जावी, अशी आग्रही मागणी आता रक्तपेढ्यांतील सदस्य करत आहेत. जेणेकरुन आपत्कालीन परिस्थितीत तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये. ही मागणी केंद्रीय पातळीवरही सातत्याने केली जात असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिका-यांनी दिली.
बॉम्बे ब्लडग्रुपबाबत –
बॉम्बे ब्लड ग्रुप हा अतिशय दुर्मिळ रक्तगट आहे. या रक्तगटाचा शोध मुंबईत केईएम रुग्णालयात १९५२ साली लागला. त्यामुळे या रक्तगटाला बॉम्बे ब्लडग्रुप म्हणून ओळखले जाते. या रक्तगटातील व्यक्तीच्या शरीरातील लाल रक्तपेशींमध्ये अ,ब आणि एच हे तिन्ही एन्टीजन्स आढळून येत नाही. साधारणतः ७ हजार ६०० माणसांमध्ये एका व्यक्तीला बॉम्बे ब्लडग्रुप असतो.
Join Our WhatsApp Community