लसींचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम

आजपर्यंत लसीकरण मोहिमेत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ डोस देण्यात आले आहेत.

70

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात लसींचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र केवळ अव्वल नाही, तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन, त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ डोस देण्यात आले आहेत. ५ मे रोजी महाराष्ट्रात १ हजार ५८६ लसीकरण केंद्रांद्वारे  एकूण २ लाख ५९ हजार ६८५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील १ लाख ५३ हजार ९६७ नागरिकांचा समावेश आहे.

इतके झाले लसीकरण

राज्यामध्ये आतापर्यंत १ कोटी ३९ लाख १५ हजार ८८ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला, तर २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

(हेही वाचाः राज्यातील 11 जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या होतेय कमी)

लस वाया जाण्याचे प्रमाण १ टक्के

महाराष्ट्राने लसीकरणात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ १ टक्के आहे. लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी वेळोवेळी अभिनंदनही केले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान (१ कोटी ३५ लाख ९७ हजार), गुजरात (१ कोटी ३२ लाख ३१ हजार), पश्चिम बंगाल (१ कोटी १४ लाख ७५ हजार), कर्नाटक (१ कोटी १ लाख ११ हजार) इतके लसीकरण झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.