खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट थांबणार… असे आहेत दर

आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल व पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील.

137

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करुन दर निश्चित केले आहेत, यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

गाव आणि शहरी भागांत वर्गीकरण

खासगी रुग्णालयात कोविडबाधित रुग्णांवर उपचारासाठी ८० टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित २० टक्के खाटांसाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचनेस मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्याशी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने या दरांमध्ये गाव, शहरांचे वर्गीकरण करुन बदल करण्याबाबत ठरले आहे.

(हेही वाचाः खासगी रुग्णालये बंद करतायेत कोविड कक्ष!)

ग्रामीण भागात उपचार स्वस्त

यापूर्वीच्या अधिसूचनेत उपचारांचे दर हे मोठ्या शहरातील रुग्णालये व अति दुर्गम भागातील रुग्णालये यासाठी एकच होते. शहरांच्या वर्गीकरणामुळे आता उपचारांच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. विमा कंपन्या आणि विविध प्रकारचे भत्ते देताना ज्याप्रमाणे शहरांचे वर्गीकरण केले जाते. त्याच निकषावर वर्गीकरण आणि संबंधित उपचारांचे दर निश्चित केल्याने, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांवरील उपचारांचा खर्च तुलनेने कमी होणार आहेच. दरांसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. अ, ब, क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केली आहे. त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल व पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील.

रुग्णाला संबंधित रुग्णालयाने पूर्व देयके देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे. अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली.

(हेही वाचाः कोविड वॉर्डामध्ये रूपांतरित केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा यार्डात!)

जास्तीत जास्त किती दर आकारले जाऊ शकतात

वॉर्डमधील नियमित विलगीकरण (प्रती दिवस)

  • अ वर्ग शहरांसाठी ४ हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३ हजार रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २ हजार ४०० रुपये.
  • यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधे, बेड्सचा खर्च व जेवण याचा समावेश.
  • कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल.
  • केवळ मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधे यातून वगळली आहेत.

व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण

  • अ वर्ग शहरांसाठी ९ हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ६ हजार ७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५ हजार ४०० रुपये

केवळ आयसीयू व विलगीकरण

  • अ वर्ग शहरांसाठी ७ हजार ५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५ हजार ५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४ हजार ५०० रुपये
  • अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र(भिवंडी, वसई-विरार वगळून), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर (नागपूर मनपा, दिगडोह, वाडी)
  • ब वर्ग शहरांत नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली
  • क वर्ग भागात अ आणि ब वर्ग शहरांव्यतिरिक्तचे इतर सर्व जिल्हा मुख्यालये यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.