ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही पावसाची मुंबईकरांकडे पाठ; हवामान खात्याचा अंदाज

जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून ब्रेकवर गेलेल्या पावसाचा यंदाच्या आठवड्यातही थांगपत्ता नसल्याचे चिन्ह आहे. परिणामी दुपारपासून सुरु होणाऱ्या घामाच्या धारा सायंकाळपर्यंत त्रास देत असल्याच्या यातना मुंबईकरांना या आठवड्यातही सोसाव्या लागणार आहेत. सोमवारी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमाल तापमान 32 अंश सेल्सीयसवर पोहोचण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. पहिले चार दिवस मुंबईत पावसाचे शिडकावेच मुंबईकरांच्या भेटीला येतील.
ऑगस्ट महिन्याचे पहिले चार दिवस  पावसाची सुतराम शक्यता नाही. पहिले चार दिवस मुंबईत कमाल तापमान 31 ते 30 अंश सेल्सीयसदरम्यान राहील. मात्र किमान तापमान हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. रविवारी 31 जुलै रोजी मुंबईत 26.2 अंश सेल्सीयस किमान तापमानाची नोंद झाली होती. सोमवारीही किमान तापमान 26 अंशावर कायम राहील, त्यानंतर किमान तापमान एका अंशाने खाली उतरत जाईल. तीन तारखेला किमान तापमान 24 अंशांपर्यंत खाली सरकल्यानंतर पुढच्या तीन दिवसांपर्यंत किमान तापमानवाढीची शक्यता नाही.
सध्या मुंबईतील आद्रता 76 ते 79 टक्क्यांपर्यंत नोंदवली जात आहे. वातावरणात 60 टक्क्यांपेक्षा आद्रतेचे प्रमाण जास्त राहिल्यास, घाम येण्याची दाट शक्यता असते.

शुक्रवारपासून पाऊस

5 ऑगस्टपासून मुंबईत पावसाची शक्यता असल्याचा, अंदाज भारतीय वेधशाळेने आपल्या आठवड्याभराच्या अंदाजपत्रात जाहीर केला आहे. शुक्रवार आणि शनिवार दोन्ही दिवस मुंबईत पावसाची शक्यता  आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here