स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीद्वारा संचलित महाराष्ट्र मिलिटरी स्कूल या निवासी सैनिकी शाळेचा यंदाच्या वर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून गेल्या 15 वर्षांची उज्ज्वल यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे.
शुक्रवार, २ जून रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. या निकालानुसार शाळेतील प्रविष्ट झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी साठ टक्के विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. तर उर्वरित सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शिवाय शाळेतील 90 टक्के विद्यार्थी विविध खेळांमधून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व करत असून तिथेही त्यांची उत्तम कामगिरी आहे.संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, कार्यवाह रणजित सावरकर व कोषाध्यक्ष सुरेश जाधव आणि शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र मिलिटरी स्कूल ही शाळा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकासासाठी विशेष लक्ष देऊन सतत प्रयत्न करते. शाळेत शालेय शिक्षणाबरोबरच वर्षभर अनेकविध उपक्रम राबविले जातात. शाळेची सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु असून पाचवी ते आठवीसाठी मोजक्याच जागा उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांना प्रवेश घेता येईल, अशी माहितीही प्राचार्य भोईर यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत 9270507597, 9273115838, 8888195574 या क्रमांकावर संपर्क साधावा असे त्यांनी कळविले आहे.
Join Our WhatsApp Community