पावसाळ्याला सुरुवात होत नाही तोच मुंबईत आता विशिष्ट भागांतीलच इमारती कोसळू लागल्या आहेत. ७ जून रोजी वांद्र्यातील बहिराम पाड्यातील ४ मजली इमारतीचा एक भाग कोसळून १ जणाचा मृत्यू झाला होता. आता ९ जून रोजी रात्री उशिरा मालवणीत गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे
काय घडले रात्री?
सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी, 9 जून रोजी रात्री 11 वाजता ही दुर्घटना घडली. मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 17 जणांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढले आहे. मात्र अद्याप अजून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तसेच अद्याप काही जण या ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या दुर्घटनेतील जखमींना कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचा : आता रायगड जिल्ह्यात पावसाचा लॉकडाऊन! )
अतिवृष्टीमुळे दुर्घटना! – असलम शेख
मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय या इमारतीचा ढिगारा उपसून त्यात काही जण अडकले आहेत का याचाही शोध सुरु आहे.
Extremely pained!
My thoughts are with the families of victims who lost their loved ones. I also pray for the speedy recovery of the injured. We express our full support for the ongoing rescue efforts at the site of the tragedy. https://t.co/oJ65FL4lnz— Aslam Shaikh, INC 🇮🇳 (@AslamShaikh_MLA) June 10, 2021
बेकायदा बांधकामे कारणीभूत?
वांद्रे बहिराम पाडा मालवणी परिसर असो ठिकाणी अत्यंत दाटीवाटीत ३-४ इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यांना गैरमार्गाने परवानगी दिली जाते. त्या धोकादायक असल्याचे सांगत महापालिका पावसाळ्यापूर्वी नोटीसही देते, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे त्यावर कारवाई होत नाही. त्याचे पर्यवसन मात्र अशा दुर्घटनेत होऊ लागते, अशी संतप्त प्रतिक्रिया जनमाणसांमधून येत आहे.
मृतांच्या नातलगांना राज्याकडून ५ तर केंद्राकडून २ लाख
मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा सर्व खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच पालिका आयुक्तांशी चर्चा केली. तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलिस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयांत नेऊन शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयात ( शताब्दी रुग्णालय) जाऊन या दुर्देवी घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली. तर पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान @narendramodi यांनी, मुंबईत मालाड पश्चिम इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
— PMO India (@PMOIndia) June 10, 2021
मालवणी दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल!
मालवणी दुर्घटनेप्रकरणी इमारतीचा मालक आणि ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात इमारतीचा मालक शफीक सिद्दीकी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच ठेकेदार रमजान अली शेख याला अटक करण्यात आली आहे. या दोघांवर 304(2), 336, 337, 338, 34 IPC व्यतिरिक्त 304 (A) गुन्हा दाखल झाला आहे.
Join Our WhatsApp Community