संचारबंदीच्या काळात बाहेरगावी जाणा-या नागरिकांना कोणतेही पास दिले जाणार नाहीत, असे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांकडू सांगण्यात आले होते. पण आता या निर्णयात बदल करण्यात आला असून, आपत्कालीन सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ई-पासची सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. महाराष्ट्र पोलिसांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
ट्वीट करत दिली माहिती
राज्यात सर्वत्र ब्रेक दि चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले असताना, आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ही ई-पासची सेवा सुरू करण्यात येणार आहे, असे या ट्वीटद्वारे सांगण्यात आले आहे. त्याकरता महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या संकेत स्थळावर किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन अर्ज करता येईल असे महाराष्ट्र पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या पासचा वापर केवळ आणि केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच करता येणार असल्याचे, पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये अंत्यविधी किंवा इतर तातडीच्या आरोग्य विषयक कारणासाठीच प्रवास करता येणार आहे. राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात येत आहे.
आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता: https://t.co/c2fxPS3Qzv
अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.
पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा.#EPassForTravel
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) April 23, 2021
(हेही वाचाः ‘गर्लफ्रेंडला’ भेटायचं आहे, कोणतं ‘स्टीकर’ लावू? विरहव्याकूळ तरुणाचा पोलिसांना प्रश्न! काय मिळाले उत्तर? वाचा…)
काय म्हणाले होते पोलिस महासंचालक
संचारबंदीच्या काळात बाहेरगावी जाणाऱ्यांना यंदा कुठल्याही प्रकारचे पास वाटप करण्यात येणार नसल्याचे, राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी १४ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. नागरिकांनी योग्य कारणाशिवाय बाहेर पडू नये, योग्य कामासाठी बाहेर पडताना ओळखपत्र अथवा योग्य कारण असल्याचा पुरावा घेऊन बाहेर पडावे, असे आवाहन पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी यावेळी केले होते.
Join Our WhatsApp Community