रत्नागिरी जिल्ह्यात १४३५ पाणमांजरी आणि २४५ मगरी असल्याचे नुकत्याच झालेल्या गणनेतून समोर आले आहे. तब्बल १० नद्या, खाड्या, सिंचन तलावांमध्ये गुळगुळीत कातडीच्या पाणमांजरांची संख्या अंदाजे १ हजार ४३५ आहे. तर दलदलीत राहणा-या मध्यम आकाराच्या २४५ मगरी आहेत. ही गणना वनविभागाच्या कांदळवन कक्ष आणि पुण्यातील इला फाऊंडेशन या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या अभ्यासातून समोर आली आहे.
सर्व्हे ऑफ ऑटर एण्ड क्रोकोडायल स्पेसीज इन मॅनग्रोव्ह हॅबिटॅट्स ऑफ रत्नागिरी असे या अहवालाचे नाव आहे. एप्रिल २०१९ ते जुलै २०२१ या काळात ही गणना केली गेली. इला फाऊंडेशनचे संचालक डॉ. सतीश पांडे, अनंत गोखले, राम मोने, राजकुमार पवार, सुधन्वा राजुरकर आणि राहुल लोणकर यांनी या अहवालात लेखन केले आहे.
छायाचित्र – स्वस्तिक गावडे
कशी पार पडली गणना?
नद्या, खाड्या आणि सिंचन तलावामध्ये कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञान, रिव्हर बोट, अंडरब्रिज, मॉडिफाइज सेंट स्टेशन सर्वेक्षण आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही गणना पूर्ण केली गेली. पाणमांजर आणि मगरींसाठी १० ठिकाणी लक्ष ठेवण्यात आले होते. त्यापैकी जैतापूर खाडीच्या ठिकाणी सर्वात जास्त पाणमांजरे आढळली. जैतापूरमध्येच जास्त मगरी आढळल्या.
पाणमांजरांची संख्या – गाड नदी, वसिष्ठी नदी, जैतापूर खाडी – ३५६, अर्जुना नदी, जैतापूर खाडी – ४१८, काजळी नदी, भाट्ये खाडी – १५७, गोलप नदी, पावस खाडी – ३०, मुचकुंदी नदी, पूर्णगड खाडी – १२७, गणपतीपुळे, आरेवारे, वरवरे खाडी – १६८, जगबुडी नदी – १६०, सिंचन तलाव – १९
एकूण – १ हजार ४३५
(हेही वाचा चंद्रपूर जगात सर्वात जास्त उष्ण शहर)
मगरींची संख्या – गाड नदी, वसिष्ठी नदी, जैतापूर खाडी -१०६, अर्जुना नदी, जैतापूर खाडी – ०, काजळी नदी, भाट्ये खाडी – ०, गोलप नदी, पावस खाडी – ०, मुचकुंदी नदी, पूर्णगड खाडी – ०, गणपतीपुळे, आरेवारे, वरवरे खाडी – ०, जगबुडी नदी – ७४, सिंचन तलाव – ६५
एकूण – २४५
छायाचित्र – स्वस्तिक गावडे
पाणमांजर शोधण्यास कठीण
पाणमांजर हा शोधण्यास अत्यंत कठीण जलचर प्राणी आहे. पाणमांजर जमिनीवर व पाण्यात विहार करतो. पाणमांजर हे क्वचित नजरेस पडते. हे बहुधा कांदळवनामध्ये किंवा कांदळवन परिसरात आढळतात. ही प्रजाती टिकवून राहण्यासाठी कांदळवनाचे संवर्धन महत्त्वाचे ठरते. पाणमांजर इतर जलचरांचे खाद्य असते, त्यामुळे इतर जलचर प्रजातींना पाणमांजर आधार देते.
– डॉ सतीश पांडे, संचालक, इला फाऊंडेशन
वातावरण बदलांचा पाणमांजरांना धोका
वातावरण बदलाचा पाणमांजरांवर गंभीर परिणाम झाल्याची माहिती इला फाऊंडेशनचे संचालक डॉ. सतीश पांडे यांनी दिली. पाणमांजरे बहुतेक खाड्या, नद्या, लघु सिंचनात राहतात. जलाशय सुकले तर अन्न उपलब्ध न झाल्याने पाणमांजरांची आबाळ होईल. शिका-यांसाठी पाणमांजरे सहज लक्ष्य होतील, अशी भीतीही डॉ. पांडे यांनी व्यक्त केली. पाणमांजरांसाठी कांदळवनाचा अधिवास महत्त्वाचा आहे. ही प्रजाती कांदळवन व तिथल्या वनस्पतींवर जगते. मात्र किनारपट्टीवरील पूरांचे प्रमाण वाढल्यास पाणमांजरांच्या संख्या कमी होईल, अशीही भीती डॉ पांडे यांनी व्यक्त केली.
मानवी हस्तक्षेपही जबाबदार
मगरींच्या अधिवासात माणसांचा वाढता हस्तक्षेप, खाडी किनारी होणारी वाळू उपसा, सस्तन माशांची शिकार, वाढते जलप्रदूषण यासह भटके कुत्रे आणि माणसांकडूनही मगरींची अंडी फोडली जात असल्याचा मुद्दा अहवालात उपस्थित करण्यात आला.
Join Our WhatsApp Community