५वी आणि ८वी च्या शिष्यवृत्ती परीक्षांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय… आता कधी होणार परीक्षा?

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३ मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्य शासनाकडून १ली ते १०वी पर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे आता ५वी आणि ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा राज्य शासनाकडून पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या राज्य परीक्षा परिषदेकडून प्रसिद्धीपत्रक काढून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

पुढची तारीख योग्य वेळी जाहीर होणार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३ मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८वी) ही पुढे ढकलण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळवण्यात येईल, असेही शिक्षण विभागाच्या राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचाः कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी टास्क फोर्स!)

एकूण ६ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थी परीक्षा देणार

याआधी ही परीक्षा २५ एप्रिल रोजी ठरवण्यात आली होती. पण तेव्हाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा २३ मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदा राज्यभरातून शिष्यवृत्ती परीक्षेकरता एकूण ४७ हजार ६६२ शाळांनी नोंदणी केली आहे. इयत्ता ५वी चे ३ लाख ८८ हजार ३३५, तसेच इयत्ता ८ वीचे २ लाख ४४ हजार १४३ असे एकूण ६ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी हीच आमची प्राथमिकता आहे, अशी  माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here