राज्याच्या अर्थव्यवस्थेला कोविड काळातही बळकटी देण्या-या शेतक-यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. त्यात व्याजदरात अधिक सूट देण्याचा निर्णय 10 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्य शासन देत असलेली व्याज दर सवलत तीन टक्के व केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळाल्याने, शेतकऱ्यांना सदर पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.
काय आहे निर्णय?
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी, शून्य टक्के दराने व्याज आकारणी केली जाईल. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
#मंत्रिमंडळनिर्णय
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. pic.twitter.com/Xd1uol0s8Q— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 10, 2021
(हेही वाचाः म्युकरमायकोसिस झाला, दीड कोटींचा खर्च केला, तरीही डोळा गमावला! )
शेतक-यांना मिळणार दिलासा
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३% व्याज सवलत, १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत १% टक्का व्याज दरात सवलत देण्यात येत होती. आता १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास, त्यांना अधिक २% व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
असा होणार फायदा
या निर्णयानुसार आता विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या कर्जावर सरसकट ३ टक्के व्याज सवलत राज्य शासनामार्फत मिळेल व केंद्र शासनामार्फत सुद्धा ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीत केल्यास ३% व्याज सवलत मिळते. त्यामुळे आता २०२१-२२ पासून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत्तीच्या कर्जाची परतफेड योग्य मुदतीमध्ये केल्यास एकूण ६% व्याज सवलत मिळून अंतिमत: त्यांना सदरचे पीक कर्ज ०% व्याज दराने उपलब्ध होणार आहे. यामुळे कृषी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
Join Our WhatsApp Community