आता ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात प्रवेश

मात्र, कोविड नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील दुकाने फक्त 7 ते 11 या वेळातच सुरू आहेत. आता हा लॉकडाऊन उठवण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र आता पावसाळ्याच्या तोंडावर राज्य सरकारने बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश केला आहे.

छत्र्या, ताडपत्री, रेनकोटच्या दुकानांना परवानगी

सुरू होणा-या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने छत्र्या, ताडपत्री आणि रेनकोटची दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात घरांची शाकारणी, त्याचप्रमाणे शहरी भागात गळती असणाऱ्या ठिकाणी ताडपत्री लाऊन बंदोबस्त करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या दुकानांचा अत्यावश्यक दुकानांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

(हेही वाचाः मुंबईचा लॉकडाऊन कधी उठणार? काय म्हणाले पालकमंत्री अस्लम शेख? )

म्हणून दिली परवानगी

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचमुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील, अशा साहित्यांची दुकाने आणि व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी देऊ केली आहे. त्यामुळे आता शहरांमध्येही हार्डवेअर आणि पावसाळी साहित्यांची दुकाने सुरू करता येतील. अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी देण्यात आलेल्या वेळेतच ही दुकाने सुरू राहतील. मात्र, कोविड नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here