राज्यातील तरुणांना राज्य सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील शिक्षण संस्थेतीळ कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि पुढील शिक्षणाची हमी देणारी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. राज्य सरकार आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे होतकरू तरुणांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे योजना?
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसोबत मिलाप हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार टाटा सामाजिक शिक्षण संस्थेमार्फत या योजनेतून यावर्षी किमान 15 हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना बारावीनंतर कौशल्य विकासाच्या आधारावर नोकरीसोबतच विविध क्षेत्रातील उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून या विद्यार्थ्यांना पदविका आणि पदवी प्रमाणत्र देण्यात येणार आहे.
(हेही वाचाः महिंद्रा फायनान्सवर आरबीआयची मोठी कारवाई, आता करता येणार नाही ‘हे’ काम)
दुस-या टप्प्यापासून सुरुवात
राज्य सरकारच्या समग्र शिक्षा कार्यालयामार्फत यापूर्वी देखील मिलाप या कार्यक्रमांतर्गत एचसीएल कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. याद्वारे 12वीत गणित विषय घेऊन उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना एकाच वेळी उच्च शिक्षण आणि नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाते. त्यासाठी आतापर्यंत 34 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या योजनेतून चालू वर्षात 25 हजार विद्यार्थी निवडण्यात येणार आहेत.
पण दुस-या टप्प्यातील योजनेत मात्र कला,वाणिज्य आणि विज्ञान अशा कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच नोकरीची हमी देण्यात येईल, असे समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अॅग्रिकल्चर,चाईल्ड केअर,इलेक्ट्रॉनिक्स मीडिया,एंटरटेनमेंट,लाईफ सायन्स,रिटेल मॅनेजमेंट,टुरिझम अँड हॉस्पिटिलिटी,आयटी इत्यादी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता घेता नोकरी करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community