आता राज्यात मिळणार हवेतून शुद्ध ‘ऑक्सिजन’… आरोग्यमंत्र्यांची माहिती

हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

89

ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून, तो रुग्णांना देणारी प्रणाली(पीएसए) बसवण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून, त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

५०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १ हजार २५० मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादित होत असून, त्याची मागणी १ हजार ७५० मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरुन काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच, स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी, यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे ३५० प्लांट बसविण्याचे नियोजन असून, त्याद्वारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे टोपे यांनी सांगितले.

(हेही वाचाः वानखेडे, ब्रेबॉर्नवर होणार ड्राईव्ह ईन लसीकरण)

इथे आहेत प्लांट

राज्यात कार्यान्वित झालेले हे ३८ पीएसए प्रकल्प बुलढाणा, वाशीम, बीड, लोखंडी सावरगाव, हिंगोली, जालना, नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गोंदिया, अहमदनगर, शिरपूर, भुसावळ, नंदुरबार, शहादा, सातारा, पुणे, बुलढाणा, चिखली, खामगाव येथील जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, खासगी रुग्णालये याठिकाणी उभारण्यात आले आहेत.

रुग्णांसाठी वरदान

वाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर, भंडारा, अलिबाग, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या मदतीने, हवेतील ऑक्सिजन शोषून तो शुद्ध करुन रुग्णांना पुरवणारे पीएसए प्लांट बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे जाणवणाऱ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर हा रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

(हेही वाचाः बीएआरसीचे ऑक्सिजन निर्मितीत पाऊल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.