एसटी कामगार पुन्हा सरकार दरबारी! जुलै महिन्याचे वेतन मिळण्याची शक्यता!

मार्च २०२० पासून ते आतापर्यंत ७ हजार कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडाले आहे. महामंडळाला प्रवासी उत्पन्नच मिळत नसल्याने गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले.

91

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. ही प्रतीक्षा महिनोंमहिने सुरुच आहे. मात्र राज्य सरकार यावर कायमस्वरूपी निर्णय घेण्यासाठी तयार नाही, हे दुखणे एसटी कर्मचाऱ्यांचे आजही आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा ऑगस्ट महिन्यातील वेतनासाठीही सरकार दरबारी दरवाजा ठोठावला आहे. ऑगस्ट महिन्यातील १७ तारीख उलटली तरी वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच वेतन देऊ, असे आश्वासन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहे.

९७ हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतिक्षा!

कोरोनामुळे लागलेले निर्बंध, त्यामुळे दुरावलेले प्रवासी, त्यातच इंधनाची दरवाढ इत्यादी कारणांमुळे एसटी महामंडळ वर्षभरापासून आर्थिक अडचणीत  आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. दर महिन्याच्या सात तारखेला होणारे वेतन ऑगस्ट महिन्याची १७ तारीख उलटूनही हाती आलेले नाही. त्यामुळे घरखर्च भागवण्याची मोठी समस्या कर्मचाऱ्यांसमोर आहे. वेतनासाठी एसटी महामंडळाने ६०० कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडे मागितली असून, त्यावर अद्यााप निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील ९७ हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतिक्षाच करावी लागत आहे.

(हेही वाचा : हुश्श! तालिबान्यांशी लढायला कुणीतरी आला…कोण आहे ‘तो’?)

आतापर्यंत ७ हजार कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडाले

मार्च २०२० पासून कोरोना व निर्बंधांमुळे एसटी सेवेपासून प्रवासी दुरावले. सणासुदीच्या दिवसातही प्रवासी मिळेनासे झाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सुटका होत असतानाच दुसऱ्या लाटेमुळेही एसटीला फटका बसला. त्यातच इंधनाचे दर वाढल्याने चिंतेत आणखी भर पडली. मार्च २०२० पासून ते आतापर्यंत ७ हजार कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडाले आहे. महामंडळाला प्रवासी उत्पन्नच मिळत नसल्याने गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले. त्यामुळे राज्य सरकारकडून आर्थिक मदत घेऊनच वेतन देण्यात आले. २०२१ मधील जानेवारी ते जून महिन्यासाठीही मदत घेतल्याने वेतन प्रश्न काहीसा सुटला होता. परंतु आता जुलै महिन्याचे वेतन ऑगस्ट महिन्यातील १७ तारीख उलूटून गेली तरी होऊ शकलेले नाही.

सरकारकडून पुन्हा आश्वासन

एकतर एसटी कर्मचाऱ्यांना इतरांच्या तुलनेत वेतन कमी असून ते सुद्धा वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून या संदर्भात राज्याचे परिवहन राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रती नेहमीच सहानुभूती दाखवली असून या वेळी सुद्धा लवकरात लवकर वेतनाचा प्रश्न मार्गी लागला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, चंद्रकांत काकडे, डी.ए. लीपने, सी.पी. राठोड, फैयाज पठाण, प्रमोद गुंडतवार, सुशांत इंगळे, गणेश शेंडगे, मनीषा कालेश्वर, कविता लांजेवार, संगीता कळंबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.