राज्य परिवहनच्या बसगाड्या होणार व्हायरस प्रूफ!

येत्या एका महिन्यात राज्यातील सर्व एसटी बसचे अँटिमायक्रोबायल केमिकल कोटिंगचे काम पूर्ण होईल. यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च महामंडळाला येणार आहे.

67

देशासह राज्यात आलेल्या कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्याचमुळे आता सर्वच स्तरामध्ये सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखत अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न होत आहे. याआधी आपण बायोबलचा वापर करून क्रिकेटचे सामने खेळवल्याचे देखील ऐकले असेलच. मात्र आता एसटीने देखील कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा निर्णय घेतला असून, एसटी महामंडळाने ताफ्यातील सर्व बसगाड्यांना अँटिमायक्रोबायल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

दहा कोटी रुपयांचा खर्च येणार

कोरोना, तसेच इतर व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला असून, याकरिता निविदा देखील काढण्यात आली आहे. तसेच वर्क ऑर्डर देखील जारी करण्यात आलेली आहे. येत्या एका महिन्यात राज्यातील सर्व एसटी बसचे कोटिंगचे काम पूर्ण होईल. यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च महामंडळाला येणार आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात एसटी (शिवशाही, शिवनेरी, साध्या) गाड्या १६,०९८ आहेत. मालवाहू ट्रक १,१३० आहेत. एसटीमध्ये आसन, हॅन्ड रेस्ट गार्ड रेल, रेलिंग, दरवाजाला प्रवाशांद्वारे स्पर्श केला जातो. यामुळे कोरोना व इतर बॅक्टिरीया, व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता असते. याचमुळे आता प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी महामंडळाने एसटीला अँटिमायक्रोबायल केमिकल कोटिंग करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अँटिमायक्रोबायल केमिकल कोटिंगमुळे विविध विषाणू, जीवाणूंपासून दीर्घकाळ संरक्षण मिळते. याशिवाय वस्तूची स्वच्छता या कोटिंगने केली जाऊ शकते. स्वच्छतेवरील खर्चही कमी होतो. कोटिंग करताना बसमधील सर्व सीट, हँड रेस्ट, गार्ड रेल, खिडक्या, रेलिंग, ड्रायव्हर केबिन, फ्लोअरिंग, रबर ग्लेझिंग्ज, पॅसेंजर दरवाजा आणि आपत्कालीन दरवाजा आणि सामान कक्ष येथे मुलामा लावला जाणार आहे.

(हेही वाचा : भाजपच्या भीतीने महापालिकेत विरोधी पक्षाची धार बोथट!)

असे आहे अँटिमायक्रोबायल?

आरोग्याच्या दृष्टीने हे तंत्र विषाणूंचा प्रसार रोखते. विशेष म्हणजे एखाद्या वस्तूवर हा थर दिला असेल आणि ती वस्तू नियमितपणे किंवा सातत्याने पाण्याच्या संपर्कात असेल किंवा धुतली जात असली, तरी या कोटिंगची विषाणूरोधक क्षमता कमी होत नाही. आगामी काळात या कोटिंग तंत्राचा वर्दळ असलेल्या विविध सरकारी किंवा खासगी इमारतींमध्येही वापर वाढू शकतो. महामंडळात ही योजना एक वर्षासाठी राबवण्यात येणार आहे. दर सहा महिन्यांनी ती बदलण्यात येईल. एसटीवर लावलेले हे कोटिंग कितपत कार्यक्षम आहे, यासाठी याची वेळोवेळी स्वॅब तपासणी केली जाणार आहे. दहा दिवस, महिना, तीन महिन्याने देशातील अत्याधुनिक लॅबोरेटरीमध्ये तपासणी केली जाणार आहे.

कुठे असणार कोटिंग?

एसटी बसमध्ये आसन, हँड रेस्ट गार्ड रेल, रेलिंग, पॅसेंजर डोअर या ठिकाणी अँटिमायक्रोबायल केमिकल कोटिंग होणार आहे. अँटिमायक्रोबायल केमिकल कोटिंग वैज्ञानिकरीत्या कोरोना व्हायरस, विषाणू, बुरशी व इतर जिवाणूंपासून पुरेसे आणि दीर्घकाळ संरक्षण प्रदान करेल, हे सिद्ध झालेले आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.