मुंबईच्या रस्त्यांवरून एसटी होणार गायब!

बेस्ट परिवहनच्या सेवेसाठी मुंबईत गेलेल्या एसटी परिवहनचे कर्मचारी मोठ्या संख्येने कोरोनाने बाधित होत असल्याने कर्मचा-यांच्या आरोग्यासाठी बेस्ट उपक्रमातून एसटी महामंडळाला वगळण्यात यावे, अशी मागणी एसटी कामगार सेनेने केली आहे. 

राज्यात आणि विशेषत: मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बेस्ट परिवहनच्या मदतीसाठी एसटी सेवा धावून आली. त्यामुळे या काळात मुंबईच्या रस्त्यावर आपण एसटी धावाताना पाहिली होती. मात्र आता बेस्ट उपक्रमातील ही एसटी सेवा बंद होणार, अशी माहिती मिळत आहे. बरेचसे एसटी कर्मचारी या काळात कर्तव्य बजावताना कोरोनाबाधीत झाले आहेत. यामध्ये काहींचा मृत्यू देखील झाला. त्यातच विमा सुरक्षेचा देखील प्रश्न ऐरणीवर आला असताना आता कर्मचाऱ्यांच्या येणाऱ्या वारंवार तक्रारी यामुळे बेस्ट उपक्रमातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत होऊ शकतो. परिवहन मंत्री अनिल परब हे देखील सध्या याच विचारात असल्याची माहिती मिळत आहे.

कर्मचाऱ्यांच्या सोयी- सुविधांचेही तीन तेरा

एसटीचे कर्मचारी मुंबईत कर्तव्य बाजवण्यासाठी आले खरे, पण इथे त्यांच्या सोयी-सुविधांचे तीन तेरा वाजल्याचे अनेकदा समोर आले होते. परिवहन विभागाने कर्मचाऱ्यांची ना राहण्याची योग्य पद्धतीने सोय केली ना खाण्याची. काही महिन्यांपूर्वी गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील रॉयल पाम या हॉटेलमध्ये मुंबईत बेस्ट सेवेसाठी दाखल झालेल्या 500 एसटी कर्मचाऱ्यांची सोय करण्यात आली होती. पण हे हॉटेल आधीचे क्वॉरंटाईन सेंटर असून, या हॉटेलमधील खोल्यांची साफसफाई देखील झालेली नाही. त्यामुळे रात्री हॉटेलबाहेर येत एसटी चालक आणि वाहकांनी आंदोलन केले होते. तसेच त्याआधी याच हॉटेलमध्ये राहून घरी परतलेल्या सांगलीतील 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आधीच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

(हेही वाचा : सामंत-परबानू आता कोकणाकडे नजर ठेवा!)

कर्मचाऱ्यांसाठी काढली तिसऱ्यांदा निविदा

एसटी कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधांच्या वारंवार येत असलेल्या तक्रारी लक्षात घेता आता विभागाने तिसऱ्यांदा निविदा काढली असून, यापूर्वी ओयो कंपनी त्यानंतर कासा कंपनी सोयी-सुविधा पुरवत होती, आता तिसऱ्यांदा निविदा काढली आहे. त्यामुळे आत ही नवी कंपनी देखील कर्मचाऱ्यांना कशा सुविधा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या 200 बसेस  मुंबईकरांच्या सेवेत आहेत.

एसटी कामगार सेनेला मंत्र्यांचे आश्वासन

गेल्या वर्षापासून एसटी कर्मचारी बेस्ट उपक्रमात आपली सेवा बजावत आहे. या दरम्यान असंख्य कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत, तर काही कर्मचा-यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बेस्टच्या सेवेसाठी मुंबईत गेलेले कर्मचारी परतत असताना मोठ्या प्रमाणात कोविड संक्रमित आढळून येत असल्याने कर्मचा-यांच्या आरोग्य रक्षणासाठी बेस्ट उपक्रमातून एसटी महामंडळाला वगळण्यात यावे, अशी मागणी एसटी कामगार सेनेने केल्यानंतर याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितल्याचे एसटी कामगार सेनेकडून माहिती देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here