कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी लोकांकडून होत होती. त्यामुळे पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात निर्बंध शिथिल करण्यात येणार आहे. टास्क फोर्सने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला. या आठवड्यात टास्क फोर्स सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यात अहवालावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. अनलॉकच्या टप्प्यात लोकल सेवा सुरू करण्याबाबत मात्र लगेच निर्णय घेण्यात येणार नाही. त्यामुळे लोकल सेवेसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागेल.
आधी ‘पुनश्च हरिओम’ आता ‘ओपनिंग अप’!
राज्य सरकारने पहिल्या लाटेनंतर ‘पुनश्च: हरिओम’चा नारा दिला. त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’ म्हणत राज्य सरकारने निर्बंध लावले होते. आता ‘ओपनिंग अप’चा नारा देऊन राज्य सरकार निर्बंध हटवण्याची तयारी करत आहे. कोणते निर्बंध हटवले जावेत? कुठल्या निर्बंधता शिथिलता आणावी? कार्यालयात किती कर्मचारी असावेत? याबाबतचा अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर केला आहे. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या सदस्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत ‘ओपनिंग अप’बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
लसीकरण पूर्ण झालेल्यांना प्राधान्य!
पहिल्या टप्प्यात दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट आणि कार्यालये सुरू करण्याचा विचार आहे. त्यातही ज्या लोकांचे लसीकरण पूर्ण झाले त्यांना ‘ओपनिंग अप’मध्ये प्राधान्य दिले जाईल. यावर सध्या विचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय बाकी आहे. त्यानंतर राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्यांना ज्या लोकल प्रवासाची आशा लागली आहे त्याबाबत तुर्तास निर्णय घेण्यात येणार नाही, अशी माहिती आहे.
असे असेल ‘ओपनिंग अप’?
- टप्प्याटप्याने सर्व आस्थापना सुरू होणार
- लसीकरण पूर्ण झालेल्यांना प्राधान्य
- हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळेल
- दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण गरजेचे
- सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाचा निर्णय नाही