सध्या जरी कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने १५ जूनपासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षीही ऑनलाईन शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र ऑनलाईन शाळा सुरु होऊन आता एक महिना होईल, तरीही ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी मोबाईल आणि इंटरनेट सुविधेअभावी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे अखेर आता शिक्षकच वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन मुलांना शिकवू लागले आहेत.
औरंगाबादमध्ये शेकडो शिक्षक घरोघरी जाऊन शिकवतात!
औरंगाबाद येथील संत गाडगे बाबा आश्रम शाळा, दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इत्यादींचे शिक्षक सध्या वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन शिकवत आहेत. केवळ याच शाळेचे शिक्षक नाही, तर औरंगाबाद महापालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील शिक्षकही घरोघरी जाऊन मुलांना शिकवत आहेत. अशा प्रकारे ७२ शाळांचे २०० शिक्षक घरोघरी जाऊन मुलांना शिकवत आहेत.
महापालिकेच्या शाळांमध्ये येणारे विद्यार्थी असो कि ग्रामीण भागातील शाळांमध्ये येणारे विद्यार्थी हे सर्वजण गरीब आहेत. म्हणून हे विद्यार्थी ऑनलाईन अध्ययन-अध्यापनात सहभागी होत नाही, म्हणून शाळांनी आता शिक्षकांनाच दारोदारी, वाड्या -वस्त्यांमध्ये पाठवून मुलांना शिकवण्याचा उपक्रम सुरु केला आहे. तसेच विद्यार्थ्यांना मागील इयत्तांच्या विद्यार्थ्यांकडून पुस्तके घेऊन ती विद्यार्थ्यांना देत आहेत. अशा प्रकारे शिक्षक त्यांची पुस्तकांची समस्याही सोडवत आहेत. शिक्षक कठीण परिस्थितीत मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी प्रयत्न करत आहेत.
– सुरेश पठाडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, विभागीय कार्यवाह
हजारो विद्यार्थी मोबाईल-इंटरनेट अभावी शिक्षणापासून वंचित!
हजारो विद्यार्थी असे आहेत, ज्यांचे पालक आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील आहेत. त्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही, इंटरनेटची सुविधा नाही. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता येऊ शकत नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात असे ५० टक्के विद्यार्थी आहेत. त्यामुळे असे विद्यार्थी शाळेपासून दूर जाऊन शाळांना गळती लागत आहे. म्हणून ग्रामीण भागातील शिक्षण संस्था असो कि महापालिका, जिल्हा परिषदा असो त्यांनी शिक्षकांना वाड्या -वस्त्यांमध्ये पाठवून मुलांच्या घरासमोरच शाळा भरवण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी सध्या शेकडो शिक्षक गावागावात जाऊन ज्ञानगंगा पोहचवत आहेत.
Join Our WhatsApp Community