Mahrashtra Tourism : मुंबई-पुण्यातील मानाच्या बाप्पांचे दर्शन! आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; असे करा बुकिंग

99

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर आला आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा जोशात व उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी मुंबई पुण्यातील गणपती पाहायला जाण्याचा बेत आपण करत असाल तर तुम्हाला प्लॅनिंगची करायची अजिबात गरज नाही. कारण महाराष्ट्र पर्यटन विभागाने गणेश चतुर्थी निमित्त खास टूरचे आयोजन केले आहे. येत्या ३१ ऑगस्टला ही गणपती सहल सुरु होऊन अनंत चतुर्थी पर्यंत म्हणजेच ९ सप्टेंबर पर्यंत असणार आहे. याद्वारे मुंबई- पुण्यामधील प्रसिद्ध बाप्पांच्या दर्शनाची संधी भाविकांना मिळेल. शहरांमधील नवसाचे गणपती पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात परंतु आता गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत १०-१२ तास उभे राहण्याची गरज नाही.

मानाच्या बाप्पांचे दर्शन

पर्यटन संचालनालय (DoT) नोंदणीकृत पर्यटकांना मार्गदर्शकांच्या सहाय्याने मुंबई आणि पुण्यातील निवडक प्रसिद्ध गणेश मंडळाच्या दर्शनाची संधी देणार आहे. मुंबईत पर्यटक/भक्तांना फोर्ट चा राजा, गिरगावातील केशवजी नाईक चाळ गणपती, लालबागचा राजा, गणेश गल्लीचा म्हणजेच मुंबईचा राजा आणि GSB सार्वजनिक गणेशोत्सव समिती, वडाळा ही ठिकाणे या टूर अंतर्गत समाविष्ट असतील. याशिवाय, त्यांना परळमधील ‘गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेत’ जाण्याची संधीही मिळेल.

पुण्यातील गटाला कसबा पेठेतील कसबा गणपती, नारायण पेठेतील केसरी वाडा गणपती, गुरुजी तालीम गणपती, बुधवारपेठेतील तांबडी जोगेश्वरी गणपती, तुळशीबाग गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी दर्शनासाठी नेले जाईल.

गणपती दर्शन वेळ व सहलीचे दर

  • मुंबई: भारतीयांसाठी 850/- आणि परदेशी भाविकांसाठी 1600/- (प्रति व्यक्ती)
    वेळ: सकाळी 9 ते दुपारी 2
  • पुणे: भारतीयांसाठी 350/- आणि परदेशी भाविकांसाठी 550/- (प्रति व्यक्ती)
    वेळ: सकाळी 9 ते दुपारी 12.

पर्यटक www.bookmyshow.com वर त्यांचे ऑनलाईन बुकिंग करू शकतात.

ज्या पर्यटकांना आणि भाविकांना या प्रसिद्ध गणपती मंडळांना भेट द्यायची त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. किंबहुना, केवळ दर्शनच नाही तर या मंडळ /मंदिरांबद्दल सर्व प्रकारची माहिती देखील आमच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून दिली जाणार आहे. गणेशोत्सवादरम्यान खास तयार केलेल्या आणि श्रीगणेशाला अर्पण केलेल्या पदार्थांचाही त्यांना आस्वाद घेता येईल. हा दौरा अनुभवण्यासारखा असेल आणि यातून भाविक गोड आठवणी घेऊन निघतील.
– वल्सा नायर सिंग, प्रधान सचिव, महाराष्ट्र पर्यटन विभाग

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.