राज्यात गुरुवार, १ एप्रिलपासून लसीकरणाचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. त्यामध्ये सरसकट ४५ वयापेक्षा अधिक वयस्क असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात आरोग्यसेवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह आता ४५ हून अधिक वय असलेल्या सुमारे ४० लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. याआधीच्या टप्प्यात लसीकरणासाठीच्या नोंदणी संदर्भातील सावळागोंधळ अजून थांबलेला नसताना पुन्हा मोठ्या संख्येने नागरिकांची भर पडल्यावर त्यांचे नियोजन कसे करणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
लसींचा तुटवडा!
मुंबईत बीकेसी जम्बो, गोरेगाव नेस्को जम्बो, केईएम, नायर आणि राजावाडी या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु असून हे केंद्र दोन शिफ्टमध्ये चालवण्यात येणार आहेत. पुढील काही दिवसांत आणखी ५ नवीन केंद्रे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु करण्यात येणार आहेत. दरम्यान चौथ्या टप्प्यासाठी केंद्राने राज्याला २७ लाख डोस पाठवले आहेत, मात्र राज्य सरकारने हे डोस अपुरे असून आणखी देण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यात अधिकाधिक प्रमाणात लसीकरण सुरु केले पाहिजे, त्याकरता केंद्राने सहकार्य करावे, असे मत व्यक्त केले आहे. डोंबिवली येथे एका नागरिकाने आरोग्य सेतूवरून लसीसाठी नोंद केली असता त्यांना मोफत आणि सशुल्क लसीकेंद्रांवरही लस उपलब्ध नाही, आठवडाभर लस मिळणार नाही, असे कारण दिले.
(हेही वाचा : पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन! कसे असणार निर्बंध? वाचा)
ऍप संबंधीच्या समस्या कायम!
दरम्यान असे सर्व असले तरी लस घेण्यापूर्वी संबंधितांनी कोविन ऍप अथवा आरोग्य सेतू ऍप वर नोंदणी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यात अजूनही जुन्याच समस्या भेडसावत आहेत. ऍप चालू नसणे, सर्वर डाउन असणे अशा समस्यांना अजूनही नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांचा वेळ वाया जात आहे. त्यातच नागरिकांना सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही लसीसाठी तारीख दिली जात आहे. प्रत्यक्षात मात्र त्या दिवशी लसीकरण केंद्र बंद असते, असेही प्रकार घडत आहेत.
लसीकरणासाठी तारीख दिली रविवारची, प्रत्यक्ष लसीकेंद्र होते बंद!
ऍपद्वारे नोंदणी करताना नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांना थेट लसीकरण केंद्रावर येऊन नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली. परंतु तिथेही मोठ्याप्रमाणात गर्दी होत असल्याने ऍपद्वारे नोंदणी केलेले नागरिक आणि थेट केंद्रावर नोंदणी करणे या दोन्ही कारणांसाठी नागरिक लसीकरण केंद्रावर येऊ लागल्याने केंद्रावर गर्दी जमत आहे. एक महिन्यापूर्वी लसी केंद्राच्या तिसऱ्या टप्प्यात जेव्हा नोंदणी सुरु झाली, तेव्हा वसंत भिसे (७८) यांनी ऍपद्वारे नोंदणी करून त्यांना रविवारी, २८ मार्च रोजी तारीख दिली. त्यासाठी विरार (पश्चिम) शासकीय रुग्णालय येथील लसीकेंद्र दिले. मात्र जेव्हा ते त्या दिवशी लसीकरण केंद्रावर गेले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण ते लसीकरण केंद्र चक्क बंद होते. भिसे यांच्याकडे रितसर अपॉइंटमेंटची पावती होती, ती दाखवूनही लसीकरण केंद्रात ‘रविवार असल्याने लसीकरण केंद्र बंद आहे. रविवारच्या दिवशी सरकारी रुग्णालय उघडे नसते’, असे कारण दिले. मात्र भिसे यांनी जेव्हा अपॉइंटमेंटची पावती दाखवली, तरीही लसीकरण रविवारी बंद असते, असे सांगून परत पाठवले. अशा प्रकारे अनेक ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावरून परत गेले.