पुढील ४ तास ‘कोसळधार’! सोमवारीही पावसाची बॅटिंग सुरूच!

१३ सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता सॅटेलाइट इमेज घेण्यात आल्या आहेत. त्यावरून दक्षिण गुजरातबरोबरच उत्तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही भागांवर पावसाचे बरेच ढग दाटून आल्याचे दिसून आले आहे.

104

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पावसाची मागील २ दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी, १३ सप्टेंबरपासून पावसाने सकाळपासूनच अशीच बॅटिंग सुरु केली आहे. हवामान खात्याने पुढील ४ तास राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पाऊस चांगलाच झोडपून काढणार आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत चांगला पाऊस होणार आहे.

कुठे होणार अतिवृष्टी?

भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक (पश्चिम विभाग) कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता सॅटेलाइट इमेज घेण्यात आल्या आहेत. त्यावरून दक्षिण गुजरातबरोबरच उत्तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही भागांवर पावसाचे बरेच ढग दाटून आल्याचे दिसून आले आहे. रविवारी कोकण विभागात अनेक ठिकाणी पाऊस झाला, मुंबई, रत्नागिरीतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १४ ते १५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट विभागांत १४ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. १३ सप्टेंबरला जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. या दिवशी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

(हेही वाचा : आता सेनेचा गोव्यातही मविआसारखा प्रयोग! काय म्हणाले भाजपा नेते?)

कोकण, पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌लर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट दिला आहे.

धरणे भरली!

पुणे – पानशेत, वरसगाव, भाटघर ही तीन धरणे १०० टक्के भरली असून टेमघर धरण ९९ टक्के तर खडकवासला ९७ टक्के भरले आहे.

नाशिक – दारणा धरणातून १२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे, तर गंगापूर धरणातून १ हजार ५००, नांदूर मध्यमेश्वर १३ हजार, कडवा २ हजार २००, आळंदी ३० तर
वालदेवी १८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.