शिर्डी साईभक्तांसाठी आता ऑफलाईन दर्शन सेवा सुरू

नव्या नियमांनुसार १५ हजार ऑनलाइन आणि आणखी १० हजार ऑफलाइन असे २५ हजार भाविक दररोज दर्शन घेऊ शकणार

कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने जिल्हा प्रशासन व शिर्डी संस्थानाने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. साईबाबा मंदिरात दर्शनासाठी आता ऑफलाइन पास देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या नियमांनुसार १५ हजार ऑनलाइन आणि आणखी १० हजार ऑफलाइन असे २५ हजार भाविक दररोज दर्शन घेऊ शकणार आहेत. ऑफलाईन पाससाठी शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे यासंबंधीची मागणी केली होती. यानुसार, आपत्ती व्यवस्थापनाशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला.

नियमांचे पालन करणे बंधनकारक

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटले आहे की, “बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, साईबाबा टेम्पल ट्रस्टला कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करताना ऑफलाइन प्रणालीद्वारे दररोज १० हजार भाविकांना परवानगी देण्याची परवानगी देण्यात आली आहे.” तसेच, प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारने विहित केलेल्या कोविड-१९ नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

( हेही वाचा : पावसाळी शेड चार महिन्यांकरता कशाला? वर्षभराकरता परवानगी द्या! भाजपची मागणी )

मंदिर परिसरात होणार पासचे वाटप

भाविकांचे वाढते प्रमाण, ऑनलाइन पास मिळण्यात येणाऱ्या अडचणी होत्या, त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत होता. म्हणून, प्रशासनाने ऑफलाईन पासला परवानगी दिली आहे. शिर्डी मंदिर परिसरात या पासचे वाटप होणार आहे. मात्र, भाविकांनी गैरसोय टाळण्यासाठी शक्यतो ऑनलाइन बुकिंग करूनच यावे, असे आवाहन शिर्डी संस्थान तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here