महाराष्ट्र रियल एस्टेट नियामक प्राधिकरणाने (Maharashtra Real Estate Regulatory Authority) म्हणजेच ‘महारेरा’ने बांधकाम व्यवसायिकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. वारंवार मागणी करुनही आपल्या वेबसाईटवर प्रकल्पांसंदर्भातील माहिती न दर्शवणाऱ्या 388 बांधकाम व्यवसायिकांना ‘महारेरा’ने दणका दिला आहे. 388 बिल्डर्सच्या प्रकल्पांची नोंदणीच ‘महारेरा’ने रद्द केली आहे.
सध्या बांधकामावस्थेत म्हणजेच अंडर कंन्स्ट्रक्शन इमारतीची स्थिती काय आहे? इमारतीच्या मूळ आराखड्यात काही बदल झाले का? किती सदनिकांची नोंदणी झाली? किती पैसे जमा झाले? किती पैसा खर्च झाला? यांसारख्या गोष्टींचे तपशील बांधकाम व्यवसायिकांनी संकेतस्थळावर नोंदवणे बंधनकारक असते. असं असतानाही त्याकडे या नियमांकडे काणाडोळा करणाऱ्या 388 बांधकाम व्यवसायिकांना ‘महारेरा’ने दणका दिला आहे. डीफॉल्टर असलेल्या या बांधकाम व्यवसायिकांच्या प्रकल्पांची नोंदणीच स्थगित करण्याचा निर्णय महारेराने (MaHaRERA) घेतला आहे.
…म्हणून कारवाई
‘महारेरा’च्या नियमानुसार, प्रकल्पांसंदर्भात तपशील बिल्डरांनी ‘महारेरा’च्या MaHaRERA संकेतस्थळावर नोंदवणं बंधनकारक आहे. जानेवारी महिन्यात नोंदविलेल्या 746 प्रकल्पांनी 20 एप्रिलपर्यंत प्रकल्पांसंदर्भातील सर्व माहिती देणे गरजेचे होते. मात्र नियोजित कालमर्यादेमध्ये माहिती देण्यात न आल्याने संबंधित बांधकाम व्यवसायिकांच्या प्रकल्पाची नोंदणी रद्द वा स्थगित का केली जाऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली. मात्र बांधकाम व्यवसायिकांनी या नोटीसकडेही साफ दुर्लक्ष केलं. अशा तब्बल 388 बांधकाम व्यवसायिकांवर ‘महारेरा’ने कारवाईचा बडगा उगारला आहे.
Join Our WhatsApp Community