राज्यभरातील सरकारी वीज क्षेत्रातील कर्मचारी मंगळवार मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपावर गेले आहेत. याचा मोठा परिणाम पुण्यात पाहायला मिळाला. पुण्यातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने पुकारलेल्या तीन दिवसांच्या संपाला मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून सुरुवात झाली.
पुण्यातील ‘या’ भागांत वीज पुरवठा खंड
पुण्यात काही भागात मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडित असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या. पिंपरी परिसरातही वीजपुरवठा विस्कळीत होता. नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील आनंदनगर, सनसिटी परिसरात पहाटे साडेतीनपासून वीज पुरवठा खंडित आहे. तर धायरी परिसरात काही भागात आणि कात्रज, टिंगरे नगर, विश्रांतवाडी, कसबा पेठ परिसरातही वीज नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
( हेही वाचा :पाकिस्तानात रात्री बाजार, माॅल,लग्नाचे हाॅल बंद ठेवण्याचे आदेश; काय आहे कारण )
वीज नसल्याने मोठा आर्थिक फटका
पिंपरी- चिंचवड येथील आकुर्डी आणि भोसरी परिसरातील लघु उद्योगांनाही वीज नसल्याने मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पिंपरी परिसरात एकूण 12 हजार लहानसहान कंपन्या आहेत. या कंपन्या वीज नसल्याने एक दिवस बंद राहिल्यास त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.