राज्यात सत्ता बदल झाला असून शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार राज्यात आल्यावर महावितरणने वीज दरात मोठी वाढ करून सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. महावितरणने इंधन समायोजन आकार प्रचंड वाढवला आहे. त्यामुळे याचा थेट फटका ग्राहकांना होणार आहे.
पुढील पाच महिन्यासाठी दरवाढ
कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. त्याला महाराष्ट्र MERC यांची परवानगी असते. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील पाच महिन्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सध्याचा समायोजन आकार वाढवला आहे. जानेवारी 2022 मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट 25 पैशांची दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील महावितणने समायोजन आकाराचेच कारण दिले होते.
(हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या वाहनासाठी यापुढे ट्रॅफिक अडवले जाणार नाही! कारण…)
इंधन समायोजन आकारात कशी वाढ झाली?
- 0 ते 100 युनिट आधी 10 पैसे, आता 65 पैसे
- 101 ते 300 युनिट आधी 20 पैसे , आता 1 रुपये 45 पैसे
- 301 ते 500 युनिट आधी 25 पैसे, आता 2 रुपये 05 पैसे
- 501 युनिटच्या वर आधी 25 पैसे, आता 2 रुपये 35 पैसे