महेंद्र उबाळे एम-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त, तर ‘बी’ विभागाच्या सहायक आयुक्तपदी धनाजी हेर्लेकर!

मालाडच्या ज्या भागाचे दोन तुकडे पाडून स्वत: सहायक आयुक्त नेमण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केली, तरी प्रत्यक्षात त्यांना पी-उत्तर विभागाला सहायक आयुक्त नेमता आला नाही.

मुंबई महापालिकेच्या दोन सहायक आयुक्तांच्या रिक्त जागी कार्यकारी अभियंत्यांना बढती देत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एम-पूर्व सहायक आयुक्तपदी महेंद्र उबाळे आणि ‘बी’ विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्तपदी धनाजी हेर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या एम-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्रीनिवास किलजे हे काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या रिक्त जागी एम-पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता यांची प्रभारी सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर ‘बी’ विभागाच्या सहायक आयुक्तपदावरून उदयकुमार शिरुरकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या जागी कार्यकारी अभियंता विवेक राही यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यानंतर प्रशासनाने राही यांना बाजुला करत ‘सी’ विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्याकडे ‘बी’ विभागाच्या सहायक आयुक्तांचा अतिरिक्त कारभार सोपवला. त्यामुळे अल्ले यांच्या खांद्यावरील भार हलका करण्यासाठी एम-पूर्व विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्याकडे ‘बी’ विभागाचा पदभार सोपवण्यात आला.

(हेही वाचा : महापालिका मलबार हिलकडील झाडांचे आरोग्य तपासणार!)

मालाडला कधी मिळणार सहायक आयुक्त?

चक्रपाणी अल्ले यांच्या खांद्यावरील भार हलका करण्यात आला असला, तरी पी-उत्तर या मालाडच्या सहायक आयुक्तपदाचा भार वर्ष उलटत आला, तरी गोरेगाव पी-दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांच्याच खांद्यावर आहे. मालाडच्या ज्या भागाचे दोन तुकडे पाडून स्वत: सहायक आयुक्त नेमण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केली, तरी प्रत्यक्षात त्यांना या विभागाला अधिकृत पालक नेमता आलेला नाही. त्यामुळे एम-पूर्व व बी विभागानंतर पी-उत्तर विभागाला सहायक आयुक्त कधी मिळणार, असा प्रश्न मालाडमधील लोकप्रतिनिधी व जनता करत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here