माहीम दर्ग्यावर येणाऱ्या मुसलमानांना समुद्रात अनधिकृत बांधकाम करण्यात आलेल्या मजारीवर बोटीने घेऊन जाणारी ‘पैलवान’ नावाने ओळखी जाणारी ही व्यक्ती कोण? त्यानेच या मजारीजवळ अनधिकृत बांधकाम केल्याची चर्चा रंगली आहे. येथील अनधिकृत झोपड्यांना देखील त्याचाच आश्रय होता, अशीही माहिती समोर येत आहे. दरम्यान समुद्रात अशा प्रकारे अनधिकृत बांधकामे करून ‘सीआरझेड’ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांत अद्याप तक्रार करण्यात आलेली नसल्यामुळे माहीम पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, परंतु येणाऱ्या काळात गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माहीम दर्गाच्या पाठीमागील समुद्रात बेकायदा मजारीसह अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत एक चित्रफीत दाखवून सांगितले. हे बांधकाम तोडण्यासाठी राज ठाकरे यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेट दिला होता, परंतु १२ तासांतच जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी करून गुरुवारी, २३ मार्च रोजी सकाळी समुद्रातील अनधिकृत बांधकाम आणि तेथील मजारचे बांधकाम तोडण्यात आले. समुद्रातील अनधिकृत बांधकामासोबत समुद्र किनारी बांधण्यात आलेल्या ५० पेक्षा अधिक अनधिकृत झोपड्या बुलडोजरच्या साहाय्याने तोडण्यात आल्या आहेत. अनधिकृत बांधकाम तोडण्याचे काम सुरु असताना तेथील स्थानिकांमध्ये ‘पैलवान’ या नावाची चर्चा सुरु होती. हा पैलवान कोण ? याबाबत उत्सुकता निर्माण झाल्यामुळे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पैलवान हा माहीम दर्गा येथे येणाऱ्या मुसलमानांना समुद्रातील मजारपर्यंत घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजेच पैलवान असे कळले.
(हेही वाचा राज ठाकरेंच्या भाषणानंतर सांगलीतील बेकायदा मशिदीवरही पडणार हातोडा)
माजरीपर्यंत मुसलमानांची ने-आण करायचा
माहीम दर्गा या ठिकाणी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मुसलमान येतात, तेथून दर्ग्याच्या आतून एक रस्ता चिंचोळ्या गल्लीतून समुद्र किनाऱ्यावर येत असे, त्या ठिकाणी आल्यानंतर पैलवान नावाची व्यक्ती येथील भाविकांना समुद्रात असणाऱ्या मजारजवळ घेऊन जात होती, समुद्र किनाऱ्यावर त्याने एक बोट ठेवली होती. समुद्राला भरती असल्यावर हा पैलवान त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना बोटीने मजारी जवळ घेऊन जात आणि बोटीतून आणून सोडण्याचे काम करीत होता. मोबदल्यात तो लोकांकडून पैसे घेत असे अशी माहिती स्थानिक नागरिक देतात. समुद्रात पूर्वी मजार होती, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यात आलेले नव्हते, हे बांधकाम काही वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पैलवान हा मजारीची देखरेख करीत होता असे देखील स्थानिकांचे म्हणणे आहे, परंतु हा पैलवान सध्या कुठे आहे, कुठून आला होता याबाबत अधिक माहिती देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. याबाबत स्थानिक पोलिसांकडे चौकशी केली असता समुद्रात अनधिकृत बांधकामे करून ‘सीआरझेड’ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांत अद्याप तक्रार करण्यात आलेली नाही, त्यामुळे अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
माहीम दर्ग्याकडील समुद्र किनारा चरसी गर्दुल्ल्याचा अड्डा
माहीम दर्गाच्या मागे असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी दर्ग्यातून एक चिंचोळी गल्ली जाते, या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात चरसी गर्दुल्ले चरस गांजा ओढत बसलेले असतात, त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात मोठमोठे बांबू रोवून झोपड्याचे बांधकाम करण्यात आलेले होते. दोन ते तीन मजल्याच्या या अनधिकृत झोपड्यामध्ये अवैधरित्या व्यवसाय देखील केला जात होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे, माहीम पोलिसांनी अनेक वेळा या ठिकाणी छापेमारी करून चरस गांजा विक्री आणि सेवण करणाऱ्याची धरपकड करण्यात आली होती, पोलिसांकडून याप्रकारची या ठिकाणी कारवाई करण्यात येते. या झोपड्यांच्या अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या अनेक वेळा या झोपड्या तोडण्यात देखील आलेल्या, यानंतर पुन्हा या झोपड्या उभ्या बांधण्यात आल्या होत्या.