विसर्जनाला चाललेल्या भाविकांच्या अंगावर कोसळली विजेची तार, 11 जण जखमी

127

शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाच्या विसर्जनाची धामधूम असतानाच पनवेल येथे एक दुर्घटना घडली आहे. पनवेल पालिका क्षेत्रात कोळीवाडा विसर्जन घाटावर संध्याकाळी सातच्या सुमारास विसर्जनासाठी चाललेल्या गणेश भक्तांवर विजेची तार कोसळून 11 भाविकांना विजेचा जोरदार झटका बसला आहे. पाऊस सुरू असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पण यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नसून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

11 जणांना विजेचा शॉक

जनरेटरसाठी जोडण्यात आलेली विजेची तार कोसळून ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये 11 जण विजेचा शॉक लागून जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात तसेच लाईफलाईन हॉस्पिटल,पटेल आणि पटवर्धन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या कर्मचारांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत भाविकांना वेळेवर उपचार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान या दुर्घटनेमागचे कारण अग्निशमन दल आणि पोलिसांकडून शोधण्यात येत आहे.

(हेही वाचाः ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपावर कोसळले झाड, बचावकार्य सुरू)

पालिकेने विसर्जन घाटावर विसर्जनासाठी जनरेटरची सोय केली होती. याच जनरेटरची विद्युतवाहिनी तार तुटून ती थेट भाविकांच्या अंगावर कोसळली असल्याचा अंदाज पनवेल शहर पोलिस ठाण्याचे परिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.