पश्चिम महाराष्ट्रात २०१९च्या आठवणी झाल्या ताज्या! पुणे-बंगळूर महामार्ग बंद!

कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत किमान १० हजार नागरिक पुरामध्ये अडकले आहेत. त्यांची सुरक्षित सुटका करून घेणे हे मोठे आव्हान बनले आहे.

135

सलग २ दिवस मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील पंचगंगा, कृष्णा या नद्यांनी आता रौद्र  धारण केले आहे दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे २०१९ मध्ये ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला होता, त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. शुक्रवारी, २३ जुलै रोजी पुणे-बंगळूर महामार्ग कोल्ह्यापुरात बंद करण्यात आला. तर या ठिकाणी किमान १० हजार नागरिक पुरामध्ये अडकले आहेत. त्यांची सुरक्षित सुटका करून घेणे हे मोठे आव्हान बनले आहे.

११० बंधारे पाण्याखाली!

कोल्हापुरात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीने गुरुवारी रात्री धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 53 फूट एक इंचांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 110 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39, तर धोका पातळी 43 फूट आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी वेगाने वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोल्हापुरात पावसाचा वेग कायम राहिल्यास पुन्हा एकदा हाहाःकार उडण्याची भीती आहे. शहरातील दुधाळी, उत्तेश्वरपेठ, शुक्रवारपेठ, सिद्धार्थनगर, रमणमळा, जाधववाडी, कदमवाडी, बापट कॅम्प, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी कामगार चाळ, व्हीनस कॉर्नर परिसरातील शेकडो कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. दुसरीकडे आंबेवाडी आणि चिखली गाव पाण्याखाली गेले आहेत

(हेही वाचा : कोकणावर जल आपत्ती! आता महाडमध्ये दरड कोसळली! ३० घरे ढिगाऱ्याखाली!)

पुणे-बंगळूर महामार्गावर वाहनांच्या रांगा! 

कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे या ठिकाणाचा पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या ठिकाणी पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून या महामार्गाच्या भोवती पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. हा महामार्ग पहिल्यांदा २०१९ मध्ये बंद करण्यात करण्यात आला होता, तो पुन्हा २०२१ मध्ये पंचगंगेच्या पुरामुळे बंद करण्यात आला. त्यामुळे कोल्हापुरात बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची भली मोठी रांग निर्माण झाली आहे.

kolhaour

ताम्रपर्णी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात पावसाचा हाहाःकार पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे ताम्रपर्णी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे कोवाड बाजार पेठेत पाणी शिरले असून व्यापारी चिंतेत आहेत. जांबरे धरणातून 3 हजार 115 क्युसेक, तर घटप्रभा धरणातून 15616 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.

सांगली-साताऱ्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ

कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही अचानकपणे वाढ झाली, गुरुवारी रात्री 11 वाजता पाणीपातळी 30 फुटांवर गेली. त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे सांगली आणि सातारा येथे शेकडो गवे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.

(हेही वाचा : मुंबईची ‘मिठी’ काही सुटेना!)

साताऱ्यात दरड कोसळण्याच्या २ घटना

गुरुवारी, २२ जुलै रोजी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मौजे कोंढावळे, ता. वाई जि. सातारा येथील देवरुखवाडीमध्ये अतिवृष्टीने भूस्खलन झाले. यामध्ये ५ घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्या खाली दबली गेली. तसेच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २७ नागरिकांची सुटका करण्यात आली असून, अजून २ महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आहेत. ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे रेस्क्यू मोहीम थांबवण्यात आलेली होती. मात्र सकाळपासून पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरु करत बेपत्ता महिलांना शोधण्याचे काम सुरू आहे. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची दुसरी घटना घडली. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.

भीमाशंकर शिवलिंग पाण्याखाली

भीमाशंकर मंदिर परिसरात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याने गुरुवारी रात्री मंदिराला वेढा घातला आहे. भीमाशंकर हे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असून मंदिर परिसर, सभामंडप आणि पवित्र शिवलिंग मंदिरात प्रथमच पाणीच पाणी झाले आहे. भीमाशंकर मंदिराच्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर राडारोडा पसरला आहे. नाले, ओढे, भीमापात्राने मोठ्या प्रमाणात आल्याने मंदिर परिसरातील गायमुखाद्वारे पाणी गाभाऱ्यात गेल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. भीमाशंकर मंदिर परिसराच्या बाजूला असलेल्या डोंगरातून पुराचा लोट हा मंदिर परिसरात आल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सध्या मंदिराचे आणि परिसराचे भीमानदी पात्राचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.