गटारात जात होते लाखो लिटर पिण्याचे पाणी: भू-गर्भातील जलवाहिनीवर यशस्वी शस्त्रक्रिया

मागील चार महिन्यांपासून जे.जे. रुग्णालय परिसर, पायधुनी आदी परिसरात अपुरा आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या निकालात काढण्यात महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या पथकाला यश मिळाले आहे. जमिनीखाली गळती लागून लाखो लिटर पाणी गटारातून वाहून जाणाऱ्या पाण्याच्या शोध घेत त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून यामुळे या भागातील मागील कित्येक महिन्यातील पाणी समस्या दूर होऊन येथील लोकांच्या घरातील नळाला पुन्हा एकदा धो धो पाणी येऊ लागले आहे.

१२०० मि.मी व्यासाची जलवाहिनी फुटलेली 

भंडारवाडा टेकडी जलाशयामधून जाणाऱ्या १२०० मिमी व्यासाच्या बाबुला टँक आउटलेट जलवाहिनीला नूर बाग जंक्शन येथे गळती लागल्याचे सहाय्यक अभियंता जलकामे ‘बी’ विभाग यांच्या लक्षात मागील आठवड्यात आले. मात्र ही गळती मोठ्या स्वरूपाची असल्याने त्यांनी भायखळा परिरक्षण विभागाला २३ नोव्हेंबर रोजी याची कल्पना दिली. त्याप्रमाणे भायखळा परिरक्षण विभागाने त्वरित हे काम हाती घेतले. पण रस्ता खोदून जलवाहिनीची पाहणी केल्यानंतर, १२०० मि.मी व्यासाची ही जलवाहिनी, तळाच्या भागात फुटल्याचे आढळून आले. जलवाहिनीच्या लगतच असलेल्या मलनि:स्सारण वाहिनीमुळे या फुटलेल्या जलवाहिनीतील लाखो लिटर पाणी त्यातूनच वाहून जात होते. त्यामुळे फुटलेल्या जलवाहिनीतील वाहून जाणाऱ्या पाण्याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे दुरुस्तीचे काम करताना रस्त्यावर येत नव्हते. ती जलवाहिनी बदलून नवीन टाकणे गरजेचे होते.

(हेही वाचा 26/11…मुंबईत दहशतवादाने पहिले पाऊल कधी टाकलेले?)

…तरीही पाणी पुरवठा सुरळीत

बांबूला टॅंक, जे.जे. रुग्णालय परिसर आदी भागातील लाखो लोकांना पाणी पुरवठा करताना तो खंडित करणे योग्य नव्हते. या भागाला सकाळी ४ वाजता पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे जलवाहिनीतील गळती दुरुस्तीचे काम रात्री १२ नंतर थांबवण्यात आले व त्याचवेळी भायखळा पारिरक्षण येथील मशीन शॉप विभागामध्ये नवीन जलवाहिनी बसविण्यात आली. हे काम पाणी पुरवठा केल्यानंतर पुन्हा सकाळी ६ नंतर सुरू केले व रात्री १२ पर्यंत पूर्ण खड्डा खोदून, जुनी जलवाहिनी काढून तिथे नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. भायखळा परीरक्षण विभागातील सर्व कामगार व अधिकारी वर्ग आदींनी अतिशय नियोजनपूर्वक हे काम युद्ध पातळीवर सुरू ठेवताना फुटलेल्या जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा खंडित न करता गुरुवारी पहाटे २ वाजेपर्यंत दुरुस्त करत पुन्हा एकदा या भागातील लोकांना सुरळीत पाणी पुरवठा करून दिला. भायखळा परिरक्षण विभागातील सहाय्यक अभियंता शैलेंद्र सोनटक्के, दुय्यम अभियंता अभिजित देसाई, समीर तडवी व कनिष्ठ अभियंता प्रदीप बागुल, सत्यजीत भाटे, जयेश सूर्यवंशी, श्रीराम गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व कामगार व कर्मचारी वर्गाने हे काम पूर्ण केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here