बेपत्ता महिला व बालकांच्या वाढत्या प्रकरणामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न अद्यापही गंभीर आहे. सार्वजनिक तसेच निर्जनस्थळी होणा-या महिला अत्याचार, चोरी आणि हल्ले अशा घटनांना आळा बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा आणि मनुष्यबळाचा वापर करणे आवश्यक आहे. स्थानिक पोलिस आणि रेल्वे पोलिस यांनी परस्पर समन्वय साधून महिला सुरक्षाबाबतचे धोरण आखावे, असे निर्देश विधीमंडळाच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी संबंधितांना दिले.
तक्रारदार महिलांचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे समुपदेशन करावे!
बुधवारी, ७ जुलै रोजी विधीमंडळात कल्याण जि ठाणे येथील मूकबधिर मुलीवर ६ जून, २०२१ रोजी बलात्कार आणि कोळसेवाडी पोलिस ठाणे अंतर्गत मुलीवर ५ जून २०२१ रोजी झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत तसेच फटका गॅंगमुळे चोरी यातून जखमी होणाऱ्या ५९० घटना यासंदर्भात बैठक घेतली होती. याचबरोबर या बैठकीत महिलांवरील सार्वजनिक ठिकाणी होणारे हल्ले, अत्याचार व बालकांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण यावर निर्बंध घालण्यासाठीच्या उपायोजनांबाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या. यावेळी उपसभापती डॉ. गो-हे यांनी महिला आणि बालकांच्या सुरक्षितेबाबत संवेदनशील राहून गंभीर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. या बैठकीस रेल्वेचे महानिरीक्षक कैसर खलीद, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीवास्तव, ठाणेचे अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त पानसरे, पोलिस निरीक्षक संभाजी जाधव, पोलिस उपनिरीक्षक मंजुषा शेलार आदी अधिकारी उपस्थित होते. उपसभापती डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या, कोविड ताळेबंदीमुळे कुटुबियांकडून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. महिलांबरोबर संवाद वाढविणे आवश्यक आहे. महिला तक्रार निवारण समिती आणि महिला दक्षता समिती यांच्यात दृकश्राव्य पद्धतीने संवाद साधने गरजेचे आहे. तसेच, तक्रारदार महिलांचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे समुपदेशन करावे. तसेच पुणे येथे महिलांच्या सुरक्षेसाठी नोकरदार महिलांचे व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामुळे अत्याचारित महिलेला मदतीसाठी संपर्क साधणे सहज शक्य झाले आहे व त्यामुळे काही प्रमाणात अत्याचाराला आळा बसला आहे. याच धर्तीवर मुंबई, ठाणे शहर आणि ग्रामीण भागात प्रायोगिक तत्वावर महिलांचे व्हाट्स अँप चे ग्रुप तयार करण्यात यावेत व येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी.
(हेही वाचा : ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्तावर मोदींचे शिक्कामोर्तब! राणे बनले केंद्रीय मंत्री!)
निर्जन स्थळी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेराचा वापर करावा!
ताळेबंदीवर शिथीलता आल्यावर सार्वजनिक ठिकाणी तसेच रेल्वे परिसरातील निर्जन स्थळी महिलांवर अत्याचार, चोरी आणि हल्ले होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. तसेच, रेल्वेने काही बालके पळून अथवा त्यांची तस्करी होऊन त्यांच्यासोबत अत्याचाराच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने या घटनांना आळा बसावा यासाठी स्थानिक पोलिस आणि रेल्वे पोलिस यांनी समन्वय साधुन सुरक्षेसाठी धोरण ठरवावे असे उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी संबंधित अधिका-यांना सांगितले. निर्जन स्थळी सुरक्षेसाठी मनुष्यबळ आणि सीसीटीव्ही कॅमेराचा वापर करण्यात यावा. ज्या वास्तु वापरात नाही किंवा त्या वास्तु धोकादायक अवस्थेत आहेत, त्या मनुष्य वापरासाठी पुर्णत: बंद कराव्यात अथवा पाडून टाकण्यासाठीच्या प्रक्रिया करण्यात याव्यात. रेल्वेतील प्रवाशांना फटका मारून मोबाईल चोरणा-या चोरांचे विशिष्ट ठिकाण लक्षात घेऊन त्यावर सातत्याने पाळत ठेवणे व एकाच व्यक्तीकडून वारंवार हे गुन्हे घडत असल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच फटका गॅंग यांनी चोरलेल्या मोबाईल कोणत्या ग्रे मार्केटमध्ये विकले जाते याबाबत ही चौकशी करावी, असेही डॉ. गो-हे यांनी यावेळी सांगितले.
रेल्वे स्टेशन परिसरातील धोकादायक इमारतींचे पाडकाम करा!
याचबरोबर रेल्वे प्रशासनाने गुन्ह्याच्या हेतुने सुरक्षेला बाधा आल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई अथवा विमा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्यासाठीचे प्रयत्न करावेत. ज्या गुन्हेगारांची शिक्षा उपभोगल्यानंतर सुटका होते ते कोणत्या गावी जातात याची माहिती संबंधित क्षेत्रातील पोलीसांना जेल विभागाने द्यावी जेणेकरून पुढील गुन्हा घडल्यावर आळा बसेल. कोरोना काळात होमगार्ड कार्यरत नव्हते पुन्हा ते महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणे आवश्यक आहे. यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या निधींबाबतच प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सुचनाही उपसभापती डॉ. गो-हे यांनी यावेळी दिल्या. उपस्थित अधिकारी यांनी रेल्वे पोलिस आणि पोलिस यांच्या समन्वयाने महिलांवरील हल्ले आणि निर्जन स्थळी होणा-या अत्याचारा संदर्भात कारवाई करण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील धोकादायक इमारतींचे पाडकाम करण्यात येणार असलेल्या ठिकाणांची निश्चित करणेत आली आहे व ती पाडणे बाबतची कार्यवाही निश्चित करणे सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. आतापर्यंत घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा सीसीटीव्ही कॅमेराच्या सहाय्याने मागोवा घेण्यात आला असून, यातील ९५ टक्के आरोपींना अटक करण्याचे प्रमाण असल्याची माहिती अधिका-यांनी यावेळी दिली.
(हेही वाचा : हे आहेत मोदी सरकारचे संभाव्य 24 मंत्री! महाराष्ट्रातून कोणाला मिळणार संधी?)
Join Our WhatsApp Community