दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी धोक्याच्या वर गेली आहे. यामुळे शाळांना देखील सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. प्रदूषणाचा धोका कमी होत नसल्यामुळे आता केजरीवाल सरकार शहरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करत आहे.
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी एक बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी आर्टिफिशिअल रेन, म्हणजेच कृत्रिम पावसाच्या योजनेची घोषणा केली. दिल्लीमध्ये २० आणि २१ नोव्हेंबर या दिवशी कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. (Delhi Artificial Rain)
जर ठरलेल्या दिवशी आकाशात ढग असतील, आणि सरकारला आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या; तर ही योजना पुढे नेली जाईल. याबाबत पुढील मंगळवारी IIT कानपूर आणि दिल्ली सरकारमधील मंत्र्यांची बैठक पार पडणार आहे. यासोबतच शुक्रवारी सरकार याबाबत सर्वोच्च न्यायालयाला देखील माहिती देणार आहे.
(हेही वाचा : Yogi Aditya Nath : पराभवाला घाबरून केदारनाथला गेले राहुल गांधी – योगी आदित्यनाथ यांची टीका)
दिल्ली मध्ये १८ नोव्हेंबर पर्यंत शाळा बंद
दिल्लीमधील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर आली आहे. तिथल्या हवेचा AQI हा ५०० पेक्षा जास्त आहे. दिल्लीमध्ये ९ते १८ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाड्यांसाठी ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू करण, तसंच दुसऱ्या राज्यातील टॅक्सींना दिल्लीमध्ये प्रवेश नाकारणे याबाबत देखील चर्चा सुरू आहे.