मलबार हिलच्या ‘त्या’ संरक्षक भिंतींचे काम पूर्ण: दोन पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

केवळ ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आले असून, २४ जून २०२१ पासून हा रस्ता पूर्ववत सुरू करण्यात आला.

गेल्या पावसाळ्यातील ५ ऑगस्ट २०२०च्या अतिवृष्टी दरम्यान दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ जंक्शन परिसरातील व केम्स कॉर्नर जवळील एन. एस. पाटकर मार्गालगतचा टेकडी उताराच्या खचलेल्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम अखेर पूर्ण झाले. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असून, याचे लोकार्पण गुरुवारी पार पडले. त्यानंतर गुरुवारपासून एन. एस. पाटकर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे लोकार्पण शहर आणि उपनगरांच्या दोन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

वाहतूक होती तात्काळ बंद

मुंबईत ५ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या मुसळधार पावसात ‘मलबार हिल’ परिसरात तब्बल ३५७ मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता. या अतिवृष्टीमुळे दक्षिण मुंबई परिसरातील बाबुलनाथ जंक्शन जवळ असणा-या एन. एस. पाटकर मार्गाला लागून असणारा टेकडीच्या उताराचा भाग ढासळला होता. यामुळे टेकडीच्या वरुन जाणारा बी. जी. खेर मार्ग देखील प्रभावित होऊन धोकादायक झाल्याने, या दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ बंद करण्यात आली होती.

अखेर रस्ता झाला सुरू

त्यानंतर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या नेतृत्वात एन. एस. पाटकर मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे काम, मुंबई महापालिकेच्या रस्ते खात्याद्वारे युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले. आय. आय. टी. मुंबई यांची सल्लागार म्हणून नेमणूक करुन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणे आणि रस्त्याखाली पर्जन्य जलवाहिनी बांधण्यासह रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे प्रत्यक्ष काम १ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात आले. त्यानंतर आता केवळ ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आले असून, २४ जून २०२१ पासून हा रस्ता पूर्ववत सुरू करण्यात आला.

संरक्षक भिंतीसोबत केलेली कामे

  • संरक्षक भिंतीलगत असणा-या सुमारे ५५० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले.
  • या रस्त्याच्या खाली १२०० मिलीमीटर व्यासाची व सुमारे ५५० मीटर लांबीची पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे.
  • या रस्त्याची रुंदी ही पूर्वी सुमारे २४ मीटर इतकी होती. ती वाढवून आता २७ मीटर इतकी झाली आहे.

या कामांचे लोकार्पण महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाला स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा, सी आणि डी विभागांच्या प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, स्थानिक नगरसेविका जोत्स्ना मेहता यांच्यासह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड आणि मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here