मालाड Malad रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला असलेल्या स्थानक रोडवरील पदपथच दुकानदारांनी अडवून ठेवल्यामुळे हडप केलेले पदपथच दुकानदारांच्या तावडीतून मुक्त करण्यात आले आहेत. पदपथ अडवल्याने प्रवाशांना आणि नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत होते. या दुकानदारांमध्ये एम एम मिठाईवाला हे अग्रेसर होते. त्यामुळे या दुकानासह इतर दुकानांच्या वाढीव बांधकामांवर पी उत्तर विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. त्यामुळे या रस्त्याची रुंदी तब्बल १५ ते २० फूट एवढी वाढली असून आता प्रवाशांना पदपथावरून चालता येणार, शिवाय यामुळे स्थानकाच्या बाहेर होणारी वाहतूक कोंडीही दूर होणार आहे.
मालाड (पश्चिम) Malad मधील उपनगरीय रेल्वे स्थानकाजवळ, आनंद मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी १९ दुकाने पी-उत्तर विभागाने शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी पाडली. मालाड (पश्चिम) मध्ये उपनगरीय रेल्वे स्थानकाबाहेरील आनंद मार्गाचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. याठिकाणी कृत्रिम दागिन्यांची बाजारपेठ आणि मासळी बाजार असल्याने याठिकाणी दररोज किमान १ लाख २० हजार नागरिकांची वर्दळ असते. उपनगरीय स्थानकाला लागून असलेल्या या परिसरातील बांधकामांमुळे रस्त्यावर नागरिकांची चालताना मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता, पी- उत्तर विभागाने याठिकाणी रस्ते रूंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.
(हेही वाचा Barsu Refinery Project : स्थानिकांच्या संमतीशिवाय बारसू प्रकल्प पुढे नेणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
महानगरपालिकेचे उपआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनानुसार, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या पर्यवेक्षणाखाली या १९ दुकानांवर कारवाई करण्यात आली. या रस्ता रुंदीकरण रेषेमध्ये एकूण १९९ बांधकामे अडथळा ठरत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी, २८ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या कारवाईत मालाड मधील एमएम मिठाईवाला दुकानासह एकूण १९ दुकानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत रस्त्याची रुंदी १३.४० मीटर झाली आहे. त्यामुळे या कारवाईमुळे सुमारे १५ ते २० फूट रस्ता रूंद करणे शक्य झाले आहे. या कारवाईमुळे रस्ता रुंद करुन, वाहतूक सुरळीत करण्यासह नागरिकांनाही रस्त्याचा सुलभपणे वापर करणे शक्य होणार असल्याचा विश्वास पी- उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी व्यक्त केला आहे. या कारवाईत महानगरपालिकेचे १५ अभियंते, ४ पोकलेन, २ जेसीबी आणि ४ डंपर तसेच ४० कामगारांचा वापर करून ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community