पश्चिम उपनगरातील मालाड मधील वाहतूक समस्येच्या निवारणासाठी पठाणवाडी येथील रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत मुंबईतील १५२ बांधकामे बाधित होत असून यातील ८१ बांधकामे पात्र ठरत आहेत. त्यामुळे पात्र बांधकामांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यामुळे बुधवारी पहिल्या दिवशी एकूण २५ बांधकामे काढण्यात आली असून गुरुवारी उर्वरीत बांधकामांवर कारवाई पुढे सुरू ठेवली जाणार आहे.
पश्चिम उपनगरांतील मालाड परिसरात वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यालयाने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी मालाड (पूर्व) परिसरातील पठाणवाडी रस्त्याचे रुंदीकरण व विकास होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते आणि त्याला यश येत आहे.
पठाणवाडी रस्त्याचे १८.३० मीटर रुंदीकरण केले जाणार असून या रुंदीकरण रेषेत सुमारे १५२ बांधकामे बांधित ठरत आहेत. ही सर्व बांधकामे विहित प्रशासकीय प्रक्रियेनुसार हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या १५२ पैकी ८१ बांधकामे नियमानुसार योग्य त्या मोबदल्यासाठी पात्र ठरली आहेत.
बांधकामे काढण्याच्या प्रक्रिये अंतर्गत बुधवारी १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुमारे २५ बांधकामे काढण्यात आली. त्यासाठी तीन जेसीबी संयंत्र, दोन डंपर, तीस कामगार आणि आठ अभियंते प्रत्यक्ष कार्यवाहीच्या ठिकाणी कार्यरत होते. गुरुवारी २ फेब्रुवारी २०२३ला ही कार्यवाही सुरू राहणार असल्याचे पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पात्रता धारकांना त्यांचा मोबदला मिळाल्यानंतर ती बांधकामे देखील तातडीने हटविली जातील. त्यानंतर महानगरपालिकेच्या रस्ते विभागामार्फत सदर रस्त्याचे रुंदीकरण व विकास काम हाती घेण्यात येईल, अशी माहितीही किरण दिघावकर यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community