मालाडमधील (Malad Road Widening) अनेक अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता महापालिकेच्या पी उत्तर विभागाच्यावतीने अतिक्रमण हटवून रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे तीन रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून रुंदीकरण करण्यात आलेल्या या रस्त्यांचेही आता डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे मालाड पूर्व मधील जी.जी.महलकरी रोड आणि खडकपाडा रोड तसेच मालाड पश्चिम येथील एस व्ही रोड हे मार्ग आता अतिक्रमणमुक्त झाल्यानंतर वाहतुकीसाठी चांगल्याप्रकारे बनवले जाणार आहेत. एस व्ही रोडवरील जुगल किशोर इमारत दारूवाला कंपाऊंड परिसरातील ११९ बाधित बांधकामे हटवण्यात आली आहेत. तीन टप्प्यात सुमारे ४०० मीटर लांबीच्या या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे.
मालाड पश्चिम मधील एस व्ही रोडवरील मालाड भागातील अतिक्रमित बांधकामे हटवून रुंदीकरण करण्यात आले आहे. या भागांमध्ये मोठ्याप्रमाणात अतिक्रमित बांधकामे होती, त्यातील पात्र कुटुंबांचे तसेच गाळेधारकांचे पर्यायी जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच अतिक्रमण हटवल्यानंतर रुंदीकरण झालेल्या स्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे.
(हेही वाचा-Israel-Hamas conflict: इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासचा उपनेता ठार)
याशिवाय मालाड पूर्व भागातील जी जी महलकरी रोड आणि खडकपाडा रोड हे दोन मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी बाधित बांधकामे तोडण्यात आली आहेत. जी जी महलकरी रोडवरील २७ बांधकामे हटवून १२०लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. तर खडकपाडा रोडवरील अनेक बांधकामे हटवण्यात आली आहेत. त्यामुळे ही बांधकामे हटवल्यानंतर या जागेवर रस्ते, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनी आणि पदपथांची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही मार्गाच्या रुंदीकरणातील बाधित बांधकामे हटवल्यानंतर रस्त्यांची सुधारणा करण्याचे काम हाती घेण्यात न आल्याने या रस्त्यांची कामे प्रलंबित होती.
महापालिकेच्या पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी या विभागाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अनेक अरुंद रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे प्राधान्याने हाती घेत बाधित बांधकामांना हटवण्याची कारवाई केली. या तीन रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या दृष्टीकोनातून बाधित बांधकामे हटवण्यात आल्याने या रस्त्यांची सुधारणा करण्याची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला.
त्यानुसार महापालिकेने या तिन्ही रस्त्यांवरील बांधकामे हटवल्यानंतर त्या जागेवर रस्त्यांच्या कामांसह पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे आणि पदपथांची कामे तातडीने करण्यासाठी निविदा मागवली आहे. त्या निविदेमध्ये एम एम कस्ट्रक्शन ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी पावणे सात कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या तिन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणासह सुधारणांची कामे पावसाळा वगळून २४ महिन्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहेत.