मालाड पश्चिमच्या सीमा रेषेला जोडून असलेल्या गोरेगाव येथील वाहतुकीचा मार्ग आता खुला होणार आहे. येथील रामचंद्र नाल्या एका बाजुचा मार्ग खुला करण्यात आला असून दुसऱ्या बाजुचा मार्ग हा बंद असल्याने या भागातील लोकांना वळणाचा प्रवास करावा लागतो. परंतु आता महापालिकेच्यावतीने दुसऱ्या बाजुचा रस्ता खुला करण्यासाठी सहा भूखंडाच्या जागा ताब्यात घेतल्या जाणार आहे. सहा भूखंडाच्या बाधित जागा ताब्यात घेतल्यास मालाडकरांचा मार्वे कडून जाणारा वळणाचा प्रवास कमी होऊन तो मार्ग सरळ होणार आहे.
अंधेरी लोखंडवालापर्यंतचा मार्ग खुला होणार
मालाड येथील मामलेदारवाडी रोड ते लिंक रोड येथील रामचंद्र नाल्याच्या दक्षिण व उत्तर दिशेला ९.१५ मीटर रुंदीचा रस्ता हा विकास नियोजन आरखड्यात दर्शवण्यात आला आहे. परंतु येथील दहिसरच्या दिशेला असणाऱ्या मार्गाचा ९.१५ मीटर रुंदीचा रस्ता बनवण्यासाठी ऑगस्ट २०१२मध्ये भूखंड ताब्यात घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरुन रस्ते वाहतूक सुरु आहे. येथील नाल्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असतानाच मोकळ्या जागेवरून वाहतूकही सुरु आहे. परंतु अंधेरीच्या दिशेला असणाऱ्या ९.१५ मीटर रुंदीचा रस्ता हा बाधित असल्याने हा मार्ग बंदच आहे. त्यामुळे अंधेरीच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांना वळणाचा प्रवास करत जावे लागते. त्यामुळे हा मार्ग खुला झाल्यास अंधेरी लोखंडवाला पर्यंतचा मार्ग खुला होणार आहे. त्यासाठी रामचंद्र नाल्याच्या दक्षिण बाजुचा मार्ग खुला करण्याच्या दृष्टीकोनातून सहा भूखंडाच्या जागा महापालिका ताब्यात घेणार आहे. यामध्ये एकूण २,२८१ चौरस मीटरची जागा ताब्यात घेतली जाणार आहे. यासाठी महापालिका २५ कोटी ४५ लाख रुपये मोजणार आहे.
(हेही वाचा मलिकांना उच्च न्यायालयाचा दणका! वानखेडे कुटुंबाची बदनामी करण्यास मज्जाव)
सहा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवण्यास सुरु
मागील अनेक वर्षांपासूनची ही समस्या असून स्थानिक आमदार व विद्यमान पालकमंत्री अस्लम शेख यांनी या रस्त्याच्या कामाकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि स्थानिक भाजप नगरसेविका जया तिवाना यांनी याचा पाठपुरावा करत प्रशासनाला यासाठीची आरक्षित जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवण्यास भाग पाडले. स्थापत्य उपनगरे समितीचे अध्यक्ष स्वप्निल टेंबवलकर यांना जया तिवाना यांचे याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी विकास नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच घटनास्थळाची पाहणी करून या जागा ताबडतोब ताब्यात घेत रस्ता बनवला जावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने सहा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे.