मालाड मधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी जी. जी. महालकारी रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असलेली २७ बांधकामे हटविण्यात आली आहे. पी उत्तर विभाग कार्यालयाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली असून कुरार गांव आणि गोरेगांव-मुलूंड जोडमार्ग यांना जोडण्यासाठी या महालकारी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे.
( हेही वाचा : Delhi–Mumbai Expressway : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या उद्घाटनानंतर अपघात)
पश्चिम उपनगरांतील मालाड परिसरात वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यालयाने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जी. जी. महालकारी रस्त्याचे रुंदीकरण हाती घेतले आहे. सध्या सुमारे १२ मीटर रुंद असलेला हा रस्ता आता १८.३० मीटर रुंद करण्यात येणार आहे. या रुंदीकरण रेषेत अडथळा ठरत असलेली २२ वाणिज्यिक तथा व्यावसायिक व ५ रहिवासी अशी एकूण २७ बांधकामे प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन हटविण्याची कार्यवाही मंगळवारी पूर्ण करण्यात आली आहे.
ही बांधकामे काढण्यासाठी दोन जेसीबी संयंत्र, एक डंपर, वीस कामगार आणि सहा अभियंते प्रत्यक्ष कार्यवाहीच्या ठिकाणी कार्यरत होते. आता लवकरच महानगरपालिकेच्या रस्ते विभागामार्फत या रस्त्याचे रुंदीकरण व विकास काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community