‘म्हाडा’च्या भरती परीक्षेत गैरप्रकार आणि डमी बसणाऱ्या ६० उमेदवारांवर म्हाडाकडून मुंबईतील पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेले उमेदवार हे औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
१०६ केंद्रांवर ऑनलाईन पध्दतीने भरती घेण्यात आली
महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) सन २०२१ मध्ये तांत्रिक व अतांत्रिक सवंर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्याकरीता सरळसेवा भरती जाहीर केली होती. पंरतु त्यावेळी कोविडचा प्रादुर्भाव असल्याने म्हाडाने सदरची भरती ही टी.सी एस. प्रा लि. च्या मार्फत ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान महाराष्ट्रातील विविध शहरांमधील १०६ केंद्रांवर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. या परीक्षा कालावधीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उपकरणासंह प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे, अवैध व्यक्तीने परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे आणि परीक्षाच्या वेळी गैरमार्गाचा अवलंब करणे या कारणावरून ९ उमेदवार विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
(हेही वाचा पाटणमध्ये लव्ह जिहाद; वासनांध मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदू मुलीला मारहाण करत लैंगिक अत्याचार )
६० उमेदवारांना संशयित वर्गवारीमध्ये समाविष्ट केले
कोविडचा प्रादुर्भाव असल्याने प्रत्येक उमेदवाराचे बायोमॅट्रिक शक्य नसल्याने परीक्षेला आलेल्या सर्व उमेदवारांचे फोटो काढण्यात आले होते. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ५६५ पदांकरीता १,६३३ गुणवत्ताधारक उमेदवारांना कागदपत्र तपासणीकरीता बोलाविण्यापूर्वी या सर्व उमेदवारांचे लॉंग डिटेल्स व त्यांचे फोटो हे टीसीएस मार्फत तपासण्यात आल्यानंतर टीसीएसच्या तपासणीमध्ये ६० उमेदवारांना संशयित वर्गवारीमध्ये समाविष्ट केले होते. टीसीएसने दिलेल्या यादीनुसार म्हाडाकडून या ६० उमेदवारांचे कागदपत्रे तसेच सामान्य प्रश्न तपासण्यात आले असता असे आढळून आले की, या उमेदवारांनी डमी उमेदवार परीक्षेत बसवले तर अनेकांनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करून परीक्षेत कॉपी करून गैरप्रकार केल्याचे म्हाडा प्रशासनच्या तपासणीत आढळून आले. याप्रकरणी म्हाडाकडून खेरवाडी पोलीस ठाण्यात या ६० उमेदवारांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी भादवी कलम ४१९, ४२० तसेच परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community